जागतिक हॉकी क्षेत्रात बलाढय़ संघ मानला जाणाऱ्या नेदरलँड्सची कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीत यजमान भारताची गाठ पडणार आहे. सहा डिसेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यात विजय मिळविण्याची नेदरलँड्सला खात्री वाटत आहे.
नेदरलँड्सचे प्रशिक्षक जोएडरे मारिजीन यांनी सांगितले, भारताला अनुकूल वातावरण व प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा मिळणार असला, तरी आमच्या खेळाडूंवर कोणतेही दडपण नाही. ही स्पर्धाजिंकण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आमचे खेळाडूंनी भरपूर सराव केला आहे आणि आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता आमच्या खेळाडूंकडे आहे. या स्पर्धेत विजयी प्रारंभ करण्याचा आमचा उद्देश असल्यामुळे पूर्ण ताकदीनिशी आम्ही भारताविरुद्ध खेळणार आहोत. नेदरलँड्सचे व्यवस्थापक व माजी ऑलिम्पिकपटू फ्लोरिस एव्हर्स यांनीही मारिजीन यांच्या मतास दुजोरा देत सांगितले, माझ्या अनुभवाचा फायदा आमच्या खेळाडूंना मिळवून देण्यासाठीच मी येथे आलो आहे. स्पर्धेत सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न आमच्या खेळाडूंकडून केला जाईल. आमच्या संघातील अनेक खेळाडू वेगवान चाली करण्याबाबत ख्यातनाम आहेत. तसेच ते तांत्रिकदृष्टय़ा परिपक्व खेळाडू आहेत.