श्रेया-झिनाच्या साथीने सांघिक पदक; अर्जुन बबुताला कांस्यपदक

भारताच्या इलाव्हेनिल व्हॅलेरियनने महिलांच्या १० मीटर एअर रायफलमधील वैयक्तिक विश्वविक्रमासह सुवर्णवेध घेतला; पण त्याचबरोबर तिने सांघिक विभागातही सोनेरी यश मिळवत कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत दुहेरी सुवर्णयश संपादन केले. भारताच्या अर्जुन बबुताने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.

१८ वर्षीय इलाव्हेनिलने विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्यांदाच सहभागी होताना सुरेख कौशल्य दाखवले. तिने पात्रता फेरीत ६३१.४ गुणांसह विश्वविक्रम नोंदवला. पाठोपाठ तिने अंतिम फेरीत २४९.८ गुणांची नोंद केली आणि विजेतेपद मिळवताना चीन तैपेईच्या लिन यिंगशिनवर मात केली. चीनच्या वाँग झेरूने कांस्यपदक मिळवले.

इलाव्हेनिलने नुकत्याच झालेल्या विश्वचषक चषक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. या प्रकारात तिने श्रेया अगरवाल व झीना खिता यांच्या साथीने सांघिक विभागात विजेतेपद पटकावले. पुरुषांमध्ये कांस्यपदक मिळवताना अर्जुनने २२६.३ गुणांची नोंद केली. युकी लिऊ (चीन) व झालन पेल्केर (हंगेरी) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. भारताच्या सूर्यप्रताप सिंग व शाहू माने यांना अनुक्रमे सहावे व आठवे स्थान मिळाले.

विश्वचषक स्पर्धेतील सहभाग निश्चित झाल्यानंतर त्यामध्ये सर्वोच्च यश मिळवण्यासाठी मी भरपूर तयारी केली होती. गेले काही महिने माझी कामगिरी सातत्याने चांगली होत असल्यामुळे येथे सुवर्णपदक मिळवण्याची मला खात्री होती. माझ्या यशाचे श्रेय गन फॉर ग्लोरी अकादमीचे संस्थापक व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते गगन नारंग यांना द्यावे लागेल. हे सोनेरी यश नारंग सरांना तसेच माझ्या आईवडिलांनाच समर्पित करते.    – इलाव्हेनिल व्हॅलेरियन

इलाव्हेनिलकडे विश्वचषक स्तरावर अव्वल यश मिळवण्याची क्षमता आहे, हे आम्ही ओळखले होते. आम्ही तिच्यावर ठेवलेला विश्वास तिने सार्थ ठरवला आहे. पुढेही तिच्याकडून अशीच सर्वोच्च कामगिरी होईल असा मला आत्मविश्वास आहे.        – गगन नारंग