ओडीशातील भुवनेश्वर शहरात खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने कंबर कसलेली पहायला मिळते आहे. भारतीय संघाला सर्वोत्तम प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून आणखी एका प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. हॉलंडचे माजी खेळाडू राऊल एहरेन यांची भारतीय हॉकी संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांना एहरन प्रशिक्षणाच्या कामात मदत करणार असल्याचं हॉकी इंडियाने स्पष्ट केलं आहे. १ डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र एहरन यांच्याकडे वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेपुरती भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचंही कळतंय.

हॉकी इंडियाचे High Performance Director डेव्हिड जॉन यांच्यामते भारतीय हॉकीसंघाला, महत्वाच्या स्पर्धांमध्ये सहाय्यक प्रशिक्षकांची गरज आहे. यातच रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर तत्कालीन Strategy Coach हन्स स्ट्रिडर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेत एहरेन स्ट्रिडर यांची जबाबदारी पार पाडणार असल्याचं कळतंय.

काही महिन्यांपूर्वी हॉकी इंडियाचे मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी एरहेन यांना हॉकी इंडियासाठी काम करण्याबद्दल विचारलं होतं. मरीन आणि एहरेन यांनी याआधी हॉलंडच्या ज्युनिअर संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे. यानंतर एहरेन यांच्या नियुक्तीसाठी हॉकी इंडियाने पाठवलेला प्रस्ताव ‘साई’ने (Sports Authority of India) मान्य केला आहे. मरीन यांच्याप्रमाणे एहरेन यांच्याकडे पुरुष संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव नाहीये. मात्र स्थानिक पातळीवर एहरेन यांची हॉकीतली कारकिर्द पाहून हॉकी इंडियाने वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेसाठी त्यांची सहाय्यक प्रशिक्षकपदालक नेमणूक केल्याचं समजतंय.