भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याचं संघातलं यष्टीरक्षक म्हणून महत्व आपण सर्वच जाणून आहोत. भारताच्या कित्येक सामन्यांमध्ये धोनी गोलंदाजीदरम्यान क्षेत्ररक्षणापासून, गोलंदाजांना सल्ले देण्याचं काम करत असतो. अनेकदा कर्णधार विराट कोहली सीमारेषेवर आणि सामन्याची सुत्र धोनीच्या हातात असं चित्र आपण पाहिलेलं आहे. मात्र इंग्लंडमध्ये सराव सामन्यादरम्यान धोनीने फलंदाजी करत असताना चक्क बांगलादेशच्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा सल्ला दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

४० व्या षटकात बांगलादेशच्या सब्बीर रेहमानच्या गोलंदाजीदरम्यान एक क्षेत्ररक्षक आपली जागा सोडून चुकीच्या जागी उभा होता. ही बाब धोनीच्या लगेच लक्षात आली आणि त्याने सामना मध्येच थांबवत सब्बीरला फिल्डरची जागा बदलण्याचा सल्ला दिला. यानंतर सब्बीरनेही लगेच क्षेत्ररक्षकाला त्याच्या जागेवर येण्यास सांगितलं.

दरम्यान धोनी आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ३५९ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशविरुद्धचा सराव सामना ९५ धावांनी जिंकत भारतीय संघाने आपला फॉर्म अजुनही कायम असल्याचं दाखवून दिलं. ५ जूनरोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.

अवश्य वाचा – निवृत्तीचा निर्णय धोनी योग्यवेळी घेईल – शेन वॉर्न