भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानात आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. शतक झळकावल्यानंतर मैदानात विराट ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करतो यावरुन मध्यंतरी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. वेस्ट इंडिजचा गोलंदाज केसरिक विल्यम्स आणि विराट कोहली यांच्यात नेहमी द्वंद्व रंगताना दिसतं. २०१७ साली विंडीजमध्ये खेळत असताना विल्यम्सने विराट कोहलीला बाद करत आपल्या पारंपरिक ‘नोटबुक सेलिब्रेशन’ स्टाईलने विराटला डिवचलं. यानंतर २०१९ साली विराटने भारतात विल्यमसच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडत त्याच पद्धतीने सेलिब्रेशन करत आपला जुना हिशोब चुकता केला. या सर्व प्रकारावर पहिल्यांदाच विल्यम्सने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया दिली आहे.

“२०१७ साली विराटला बाद केल्यानंतर मी पहिल्यांदा त्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं. माझ्या चाहत्यांना ते आवडतं म्हणून मी तसं करतो. पण विराटने बहुदा ही गोष्ट मनात ठेवली. तो सामना संपल्यानंतर मी विराटसोबत हात मिळवला आणि त्यानेही माझ्या गोलंदाजीचं कौतुक केलं आणि तो निघून गेला. मात्र ज्यावेळी आम्ही भारतात खेळायला आलो आणि ज्यावेळी विराट फलंदाजीसाठी मैदानात आला त्यावेळी तो मला सारखं म्हणत होता की तुझी नोटबुक सेलिब्रेशन स्टाईल इथे चालणार नाही. मी याची पूर्णपणे काळजी घेईन. माझ्या प्रत्येक चेंडूवर तो आक्रमकपणे व्यक्त होत होता, त्यावेळी मी विराटला सरळ बोललो की तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर, तू लहान मुलासारखा वागतोयस.” एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विल्यमसने त्या द्वंद्वामागची कहाणी सांगितली.

२०१९ साली हैदराबाद येथे झालेल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने विल्यमसची फलंदाजी फोडून काढली होती. या सामन्यात विराट कोहलीने ५० चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यानच विराटने विल्यम्सला त्याच्या नोटबुक सेलिब्रेशन स्टाईलने डिवचलं होतं.