फुटबॉल क्लब्सना अधिक श्रीमंत बनवण्यासाठी नव्हे, तर प्रत्येकासाठी फुटबॉल खेळाचे रक्षण करण्याकरिता सुपर लीग फुटबॉलचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी कबुली संस्थापक सदस्य फ्लोरेंटिनो पेरेझ यांनी दिली.

रेयाल माद्रिदचे अध्यक्ष असलेले पेरेझ हे सुपर लीगच्या १२ संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ‘‘सुपर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर युरोपियन फुटबॉल महासंघ (यूएफा) बंदी घालण्याची शक्यता कमी आहे. ‘यूएफा’शी करारावर सहमत न झाल्यास नवी सुपर लीग पुढील मोसमात सुरू होणार नाही. मात्र सर्व सहभागी संघ पुढील मोसमासाठी सज्ज झाले आहेत,’’ असे पेरेझ यांनी सांगितले.

‘‘करोनामुळे काही क्लब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत. अशा कठीण परिस्थितीत फुटबॉलच्या रक्षणासाठी सुपर लीग हा एकमेव पर्याय दिसत आहे. आम्ही सर्वच क्लब सध्या खडतर परिस्थितीतून जात आहोत. जर संघांना महसूलच मिळाला नाही तर फुटबॉल हा खेळ अधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक करण्यासाठी नव्या बदलांची आवश्यकता असते. फुटबॉलप्रमाणेच या खेळातील उद्योग आणि प्रत्येक जण विकसित होण्याची गरज आहे. ‘यूएफा’मार्फत २०२४ पासून प्रस्तावित असलेले चॅम्पियन्स लीगचे नवे स्वरूप महसूल उत्पन्न करू शकणार नाही,’’ असेही पेरेझ म्हणाले.

‘सुपर लीगच्या मालकांनी निर्णयाचा फेरविचार करावा’

माँट्रेअक्स : फुटबॉल चाहत्यांचा आदर राखत सुपर लीगच्या आयोजकांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती युरोपियन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष अलेक्झांडर सेफेरिन यांनी केली आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमधील सहा नामांकित फुटबॉल क्लब्सनी स्पेन आणि इटलीतील काही क्लब्सना हाताशी धरत अमेरिकेतील अब्जाधीशांशी हातमिळवणी करून सुपर लीगची संकल्पना आखली आहे. ‘‘तुम्ही मोठी चूक करत आहात. काही जण लोभ, गर्विष्ठपणा, उद्धटपणा किंवा इंग्लंड फुटबॉलच्या संस्कृतीचे अज्ञान असे काहीही म्हणतील. पण त्याचा काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचे मन वळवण्यासाठी वेळ मिळाला आहे, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने चुका केलेल्या आहेत,’’ असेही सेफेरिन यांनी सांगितले.