बफोनच्या बचावामुळे रोमहर्षक विजय; फिओरेंटीनावर २-१ अशी मात
इटलीचा गोलरक्षक गिआनलुईगी बफोनने अखेरच्या क्षणाला निकोला कॅलिनिचा पेनल्टीवर गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडत जुव्हेंट्स क्लबच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. इटालियन फुटबॉल अजिंक्यपद म्हणजेच सिरी ए फुटबॉल स्पध्रेतील साखळी सामन्यात जुव्हेंट्सने बफोनच्या कामगिरीच्या जोरावर फिओरेंटीना क्लबचा २-१ असा पराभव करून जेतेपदावरील पकड मजबूत केली आहे. जुव्हेंट्सने या विजयाबरोबर सलग पाचव्यांदा सिरी ए फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
जुव्हेंट्सने ३५ सामन्यांत २७ विजय मिळवत ८५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. जुव्हेंट्सला प्रत्येकी चार सामन्यांत पराभव व अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले आहे. असे असले तरी दुसऱ्या स्थानावर असलेल्या नेपोली क्लबकडून त्यांना धोका आहेच. दोन्ही क्लबच्या प्रत्येकी ३ लढती शिल्लक असून जुव्हेंट्सला तिन्ही सामन्यांत बरोबरीही पुरेशी आहे.
३९व्या मिनिटाला मारिओ मॅडजुकीकने जुव्हेंट्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जवळपास ४० मिनिटे दोन्ही क्लबना गोल करण्यात अपयश आले. ८१व्या मिनिटाला निकोलाने गोल करत फिओरेंटीनाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली, परंतु हा आनंद क्षणिक ठरला. अवघ्या दोन मिनिटांत जुव्हेंट्सच्या अलव्हारो मोराटा गोल करून पुन्हा २-१ अशी विजयी आघाडी घेतली. सामन्याचे पारडे जुव्हेंट्सच्या बाजूने झुकले असताना फिओरेंटीनाला पेनल्टी मिळाली आणि त्यावर गोल करण्यासाठी निकोला पुढे सरसावला. गोलरक्षक आणि आक्रमणपटू यांच्यातील या सामन्यात बफोनने अप्रतिम बचाव करून जुव्हेंट्सचा विजय निश्चित केला.