रोमाकडून नेपोली संघाला १-० असा धक्का
रोमा क्लबने १-० अशा फरकाने जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या नेपोली क्लबला नमवल्यामुळे गतविजेत्या ज्युव्हेंट्स क्लबच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. ज्युव्हेंट्सने सलग पाच वेळा सीरी ए फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पुन्हा केला. १९३५ साली त्यांनी हा विक्रम केला होता.
रविवारी फिओरेंटीनावर २-१ असा विजय मिळवून ज्युव्हेंट्सने जेतेपदावरील पकड मजबूत केली होती, परंतु त्यांच्या मार्गात दुसऱ्या स्थानावरील नेपोलीचा अडथळा होता. सोमवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत रोमा क्लबने तो दूर केला. रॅड्जा नैनगोलानने ८९व्या मिनिटाला केलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर रोमाने १-० असा निसटता विजय मिळवून नेपोलीचे जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले.
या पराभवामुळे नेपोलीचा २६ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला, तर ज्युव्हेंट्सने १२ गुणांच्या आघाडीसह अजिंक्यपद पटकावले. जेतेपदाच्या शर्यतीतून नेपोली बाहेर पडला असला तरी, चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या साखळी गटाची पात्रता मिळवण्याचे लक्ष्य त्याच्यासमोर आहे. येथेही त्यांच्यासमोर रोमाचे आव्हान आहे. नेपोली (७३)आणि रोमा (७१) क्लबच्या तीन लढती शिल्लक आहे.
नेपोली आणि रोमा यांच्या लढतीकडे लक्ष लावून बसलेल्या ज्युव्हेंट्सच्या खेळाडूंनी रोमाच्या विजयानंतर जेतेपदाचा जल्लोष साजरा केला. मोठय़ा पडद्यावर ज्युव्हेंट्सचे खेळाडू हा सामना पाहत होते.