पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा कायम नवनवे विक्रम करताच असतो. सध्या तो जुव्हेंटस क्लबकडून क्लब फुटबॉल खेळात आहे. सीरि A स्पर्धेत रविवारी झालेल्या जुव्हेंटस क्लब विरुद्ध फिओरेंटीना क्लब यांच्यातील सामन्यात जुव्हेंटस क्लबने ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात रोनाल्डोने ७९व्या मिनिटाला गोल करत दिग्गज फुटबॉलपटू जॉन चार्लस यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

जुव्हेंटसकडून सुरुवातीला खेळताना रोनाल्डोला काही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतर सूर गवसल्यामुले त्याने गोलचा धडाका लावला. रोनाल्डोने जुव्हेंटसकडून सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये १३ सामन्यांत ९ गोल केले होते. सीरि A स्पर्धेत जीओनाच्या किर्झीस्तोफ पिएटेक याच्यानंतर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डो दुसऱ्या स्थानी होता. रविवारच्या सामन्यात रोनाल्डोने एक गोल केला आणि त्याच्या नावावर १४ सामन्यांत १० गोल झाले. युव्हेंटसकडून १४ सामन्यांत १० गोल करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. १९५७ साली चार्लस यांनी १४ सामन्यांत १० गोल केले होते. त्यामुळे ६१ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.

दरम्यान, या विजयामुळे जेतेपदाच्या दिशेने ११ गुणांची मोठी आघाडी घेतली. जुव्हेंटसने १४ सामन्यांत ४० गुणांसह जेतेपद मिळवण्याच्या दिशेने आपली दावेदारी अधिक प्रबळ केली आहे.