भारताची दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिच्यावरील आरोप भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने मागे घेतल्यामुळे बऱ्याच काळापासून ज्वाला आणि राष्ट्रीय संघटनेमध्ये असलेले वितुष्ट आता संपले आहे.
ज्वालाने गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीत झालेल्या ७८व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान ज्वालावरील आरोप मागे घेण्याचे आश्वासन गुप्ता यांनी दिले होते. त्यामुळे आता मंगळवारपासून सेऊल येथे सुरू होणाऱ्या विक्टर कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्याचा ज्वालाचा मार्ग मोकळा झाला आहे. या वर्षांतील पहिल्या सुपर सीरिज स्पर्धेत ज्वाला अश्विनी पोनप्पाच्या साथीने खेळणार होती. आता ही जोडी अधिकृतपणे राष्ट्रीय संघाचा भाग असेल.
‘‘असोसिएशनच्या निर्णयाबाबत मी आनंदीत आहे. भविष्यातील स्पर्धामध्ये मला आता भारतीय संघाकडून खेळता येईल. देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सन्मानच आहे,’’ असे ज्वालाने सांगितले. इंडियन बॅडमिंटन लीगमधील वादग्रस्त प्रकारानंतर दिल्ली आणि बंगळुरू संघांमधील सामना ज्वालामुळे उशिरा खेळवण्यात आला, असा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने ज्वालावर सहा वर्षांसाठी बंदी घालावी, अशी शिफारस केली होती. बंदीच्या भीतीमुळे ज्वालाने न्यायालयात धाव घेतली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत ज्वालाला स्पर्धामध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यावी, असे आदेश न्यायालयाने असोसिएशनला दिले होते.