भारताची दुहेरीतील अव्वल खेळाडू ज्वाला गट्टाने कामगिरीत सातत्य राखण्यासाठी तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर २०१६मध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे तिचे ध्येय आहे.‘‘कोर्टवरील माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. त्यासाठी मला तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. शारीरिक क्षमता आणि तंदुरुस्ती राखल्यास मी आणि अश्विनीला दुहेरीत विजय मिळवताना फारशा अडचणी येणार नाहीत. आमच्या कामगिरीत सातत्य असावे, यासाठी आम्ही दोघी एकत्र सराव करत आहोत,’’ असे ज्वालाने सांगितले. ज्वालाने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली होती, मात्र ती आता नोव्हेंबर महिन्यात डेन्मार्क आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या सुपर सीरिज स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे. ‘‘एका विशिष्ट वयात दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला शरीराची अधिक काळजी घ्यावी लागते. मी १६ वर्षांच्या युवा खेळाडूप्रमाणे सराव करू शकत नाही. शरीराची काळजी घेण्याबरोबरच मला शारीरिक क्षमता वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. आता ऑलिम्पिकची तयारी म्हणून यापुढील प्रत्येक स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पुढील वर्षी जवळपास सर्वच महत्त्वाच्या स्पर्धामध्ये मी सहभागी होणार आहे.’’