भारताची दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हैदराबादमध्ये बॅडमिंटन अकादमी उभारण्याच्या विचारात आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनच्या कारभारावर नेहमीच ताशेरे ओढणाऱ्या ज्वालाने आता आपल्या पद्धतीने देशातील बॅडमिंटनला नवी झळाळी देण्याचे ठरवले आहे. ‘‘मी बॅडमिंटन अकादमी स्थापन करण्याचा विचार करत आहे. सध्या सरकारशी माझी बोलणी सुरू असून आमचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. भारतात ज्या प्रकारे बॅडमिंटनची प्रगती होत आहे, त्यावरूनच मी स्वत:ची अकादमी उभारण्याचे ठरवले. माझ्या अकादमीत फक्त बॅडमिंटनविषयीच चर्चा होईल. आता पुढे काय होईल, हे येणारा काळच ठरवेल. हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी बॅडमिंटनसाठी सोयीसुविधा उपलब्ध आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरण किंवा हैदराबाद सरकारची मदत मिळाली, तर आनंदच होईल,’’ असे २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या ज्वालाने सांगितले.