उदयोन्मुख बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने थायलंड ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्याने थायलंडच्या थामासिन सिटहीकोमचा सरळ गेम्समध्ये पराभव केला. १३व्या मानांकित श्रीकांतने ४३ मिनिटांत थामासिनचा २१-१४, २१-१८ असा पराभव केला. अंतिम लढतीत श्रीकांतचा मुकाबला थायलंडच्या बुनसूक पोनसन्नाशी होणार आहे.
सुरुवातीपासून आघाडी घेत श्रीकांतने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये १७-१७ अशी बरोबरीत होती. यानंतर श्रीकांतने सलग तीन गुण मिळवत २०-१७ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.