सायना नेहवालची घोडदौड सुरू असताना किदम्बी श्रीकांतने भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत दिमाखदार कामगिरी केली. या जेतेपदासह भारतीय बॅडमिंटन विश्वातला नवा तारा ही बिरुदावली योग्यच असल्याचे सिद्ध केले आहे. अंतिम लढतीत श्रीकांतने सहाव्या मानांकित व्हिक्टर अ‍ॅक्सेलवर १८-२१, २१-१३, २१-१२ असा विजय मिळवला.
गेल्या वर्षी सार्वकालीन महान खेळाडू लिन डॅनला नमवत श्रीकांतने चीन सुपर सीरिज या खडतर स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदाच्या वर्षांची सुरुवात स्विस खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह करणाऱ्या श्रीकांतने आणखी एका जेतेपदासह एका स्पर्धेचा चमत्कार नसल्याचेही सिद्ध केले आहे.
पराभवाची भीती वाटते का या प्रश्नावर श्रीकांत म्हणाला, ‘‘पराभवाची भीती वाटत नाही आणि हीच मानसिकता कारकिर्दीत विकास घडवण्यासाठी मदत करते. प्रत्येकवेळी विजय मिळवणारच, याचाही मी विचार करत नाही. फक्त सर्वोत्तम खेळ करण्यावर भर असतो आणि त्याचमुळे पराभवाची भीती वाटत नाही.’’
‘‘अव्वल स्थान पटकवायचे, हा विचार डोक्यात सुरु असतो. जागतिक क्रमवारीत अव्वल व्हायला नक्की आवडेल. या विजयानंतर अव्वल स्थान मिळेल असे नाही, परंतु खेळात सातत्य राखल्यास हे शिखर नक्की पादाक्रांत करेन,’’ असा विश्वास श्रीकांतने व्यक्त केला़  
तो म्हणाला, ‘‘ माझ्यासाठी प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे आणि या विजयांतून प्रेरणा मिळते, तसेच पुढील स्पध्रेत सर्वोत्तम खेळ करण्यासाठी आत्मविश्वास वाढतो.’’