जामसंडे येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पध्रेत महिला गटात मुंबई उपनगर, तर पुरुष गटात रत्नागिरीने अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघांपुढे पुण्याचे आव्हान असेल.
महिलांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने मुंबई शहरला २१-११ असे पराभूत केल़े  स्नेहल शिंदे, अतिता मोहळ, नेहा घाडगे यांच्या चढाया, तर त्याला पूजा शेलार, सायली केरीपाळेच्या पकडी यशस्वी ठरल्या़  दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरने रत्नागिरीला १३-३ असे पराभूत केल़े  कोमल देवकर, अश्विनी शेवाळे यांच्या चढाया, तर राजश्री पवारच्या पकडी या विजयात महत्त्वपूर्ण ठरल्या़
पुरुष गटात विकास काळे, सुनील लांडे यांच्या पकडी व अक्षय जाधवच्या चढायांमुळे पुण्याने २९-१४ असा मुंबई शहरचा पराभव केला.़ दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने सांगलीवर ९-८ असा निसटता विजय मिळवला़  रत्नागिरीकडून कुलभूषण कुलकर्णी, अभिषेक थोरात, स्वप्निल शिंदे यांनी दमदार खेळ केला़

मानधनावरून गोंधळ!
या स्पर्धेतील खेळाडू व पंचांना योग्य मानधन न मिळाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रत्येकी पाचशे रुपये प्रवासखर्च देण्याचा राज्य शासनाचा ठराव आहे. या स्पर्धेचे ठिकाण गाठण्यासाठी नागपूर, चंद्रपूर आदी दूरच्या खेळाडूंना किमान एक हजार रुपये प्रवासाकरिता मोजावे लागतात. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी निर्माण झाली. प्रत्यक्ष प्रवासखर्च दिल्याखेरीज अंतिम सामने खेळण्यास त्यांनी नकार दिला. राज्यस्तरावरील स्पर्धामध्ये अनेक वेळा पंचांनाही वेळेवर मानधन मिळत नाही. अंतिम सामने सुरू होण्यापूर्वी हे मानधन मिळाले नाही तर या सामन्यांमध्ये काम करायचे नाही, असे पंचांनी संयोजकांना सांगितले. त्यामुळे बुधवारी सकाळपासून पंचांना मानधन देण्यास सुरुवात केली.