‘‘नोकरीचा सध्या विचार केलेला नाही. कारण प्रो कबड्डीतून वर्षांला ५० लाख रुपये सहज मिळतात. त्यामुळे सर्व छान चालले आहे!’’.. ‘कबड्डीविश्वातला विराट कोहली’ म्हणून ओळखला जाणारा राहुल चौधरी अतिशय सहजपणे हे बोलून गेला. पण त्याच्या वक्तव्यात वास्तवता होती. वर्षभर नोकरी कशाला करायची? तर संसार चालवण्यासाठी पूरक इतका पगार मिळावा म्हणून. प्रो कबड्डीतून त्यापेक्षा अधिक पैसा मिळतो आहे. राहुलला प्रो कबड्डीच्या लिलावातून ५३ लाख ९० हजार इतकी रक्कम मिळाली. याशिवाय काही सामन्यांमध्ये मिळालेल्या बक्षिसांच्या रकमांचा एकंदर आकडाही दोन-तीन लाखांपर्यंत गेला. बाकी देशाचे प्रतिनिधित्व केल्यास केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि राज्य सरकारकडून घसघशीत इनाम मिळते. आता प्रो कबड्डीच्या कक्षा रुंदावताना हे प्रातिनिधिक उदाहरण महत्त्वाचे ठरते. लीग मोठी होताना त्याचे बरे-वाईट परिणामसुद्धा दिसून येणार आहेत. भारतीय कबड्डी व्यावसायिक कबड्डी संस्कृतीकडून फुटबॉलप्रमाणे क्लब संस्कृतीच्या वाटेवर जात असल्याचे अधोरेखित होत आहे.

तीन वर्षांत प्रो कबड्डी भारतीय जनमानसात चांगली रुजली. वर्षांतून दोनदा प्रो कबड्डी खेळवण्याचा संयोजकांचा प्रयत्न मागील वर्षी फसला. पण त्यानंतर यंदा १२ संघ, १३८ सामने आणि १३ आठवडय़ांचा प्रदीर्घ कालखंडाचा प्रयोग रंगवण्यात आला. त्याच्या यशापयशाची चर्चा सुरू आहे. परंतु देशातील जवळपास तीनशे खेळाडूंना त्यामुळे आर्थिक पाठबळ मिळाले. प्रो कबड्डीत खेळायचे तर तीन महिन्यांची लीग आणि दोन महिन्यांचा सराव असे पाच महिने बाजूला काढायचे. मग नोकरीच्या ठिकाणी सांगायचे काय? खेळासाठी जात आहे, प्रो कबड्डीसाठी सुट्टी हवी आहे किंवा अन्य काही तरी. पण प्रो कबड्डीतून खेळाडूंना मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी आता बऱ्याच जणांच्या नजरेत भरू लागली आहे. त्यामुळे व्यावसायिक कंपन्यांमधील प्रो कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंचा संघर्ष आता चव्हाटय़ावर येऊ लागला आहे.

मुंबई शहरात सध्या चालू असलेल्या निवड चाचणी कबड्डी स्पध्रेतील व्यावसायिक गटात भारत पेट्रोलियम, एअर इंडिया आणि महाराष्ट्र पोलीस हे अव्वल संघ सहभागीच होऊ शकले नाहीत, याला प्रो कबड्डीच जबाबदार आहे, असे कबड्डी क्षेत्रात म्हटले जात आहे. या पाच महिन्यांच्या कालावधीमुळे व्यावसायिक कबड्डी स्पर्धाची संख्या कमी झाली आहे. किंबहुना राहुलप्रमाणे निर्णय घेत बरेचशे कबड्डीपटू प्रो कबड्डी आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संघांची निवड चाचणी इतक्यापुरतेच मर्यादित राहणार नाहीत ना, हा प्रश्न भेडसावतो आहे. मग औद्योगिक राष्ट्रीय स्पर्धासुद्धा काही वर्षांत इतिहासजमा होईल.

एके काळी राज्यातील कबड्डी हौसेखातर खेळली जायची. मग बरीचशी मंडळे अस्तित्वात आली. कालांतराने हे खेळाडू नोकऱ्या करायचे, तिथे त्यांनी व्यवस्थापनांच्या परवानगीने संघ काढले. हे संघ यशस्वी होऊ लागले, तसतसे त्यांना विशेष लाभ मिळू लागले. खेळासाठी विशेष जागा राखून ठेवल्या जाऊ लागल्या. त्यामुळे देशातील व्यावसायिक कबड्डी अधिकाधिक समृद्ध होऊ लागली. काही दशकांपूर्वी अस्तित्वात असलेले बरेचसे व्यावसायिक संघ काळाच्या ओघात बंद पडले. काही दशकांपूर्वी मुंबईत गिरण्यांचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरले होते. गिरण्यांच्या त्या सुवर्णकाळात अनेक संघ उदयाला आले होते. या व्यावसायिक कबड्डीने कबड्डीपटूंच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला होता. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास व्यावसायिक कबड्डी संघांची संख्या कमी झाल्याचे सिद्ध होत आहे. अगदी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दरवर्षी होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या आकडेवारीकडे जरी नजर टाकली तरी व्यावसायिक संघांची संख्या रोडावल्याचे सहज लक्षात येते.

प्रो कबड्डीचा उंचावणारा आलेख पाहता ही लीग आपल्याला आर्थिक सुबत्ता आणू शकते, हा विश्वास आता कबड्डीपटूंमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे उदयोन्मुख कबड्डीपटूंमध्ये नोकरीला प्राधान्य देण्यापेक्षा प्रो कबड्डीचे स्वप्न जोपासले जाऊ लागले आहे. एकीकडे व्यावसायिक क्षितिजावरील गाजलेल्या संघांमध्ये कंत्राटी नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांशी संघांमध्ये भरती प्रक्रियाच स्थगित झाली आहे. त्यामुळे चाळिशीचे खेळाडू घेऊन काही संघ कसेबसे खेळत आहेत. अशा परिस्थितीत प्रो कबड्डीची ही वाट युरोपातील व्यावसायिक फुटबॉलमधील क्लब संस्कृतीकडे घेऊन जात आहे. येत्या काही वर्षांत हा कालावधी आणखी वाढणार आहे. आता असलेल्या व्यावसायिक संघांची जागा त्यांचा प्रो कबड्डीतील संघ घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तिचे स्वागत करायचे की त्यामुळे देशातील व्यावसायिक कबड्डी संस्कृती संपून जाईल, या भीतीने ती थोपवावी, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

राकेश कुमारच्या कारकीर्दीचा अस्त?

प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात तेलुगू टायटन्सचा संघ एकूण २२ सामने खेळला. मात्र पहिल्या १० सामन्यांनंतर राकेश कुमारला संघात स्थान मिळवणेही कठीण गेले. या सामन्यांत राकेशला एकंदर २३ गुण (१६ पकडींचे आणि ७ चढायांचे) मिळवता आले आहेत. त्यामुळे ३५ वर्षीय राकेशच्या व्यावसायिक कारकीर्दीचा अस्त झाल्याचेच स्पष्ट होत आहे.

प्रो कबड्डीच्या कामगिरीचा राष्ट्रीय संघनिवडीत प्रभाव

मनजित चिल्लर, जसवीर सिंग, रोहित राणा, नीलेश शिंदे, नितीन मदने, बाजीराव होडगे यांच्यासारख्या अनेक खेळाडूंची कामगिरी म्हणावी तितकी उंचावली नाही. त्या तुलनेत प्रदीप नरवाल, श्रीकांत जाधव, विकास खंडोला, सुरजित सिंग, विशाल भारद्वाज, सचिन तन्वर, दीपक हुडा यांच्यासारख्या खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावली. आगामी आशिया चषक कबड्डी स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघनिवडीतसुद्धा प्रो कबड्डीच्या कामगिरीचा प्रभाव दिसून आला. अनुप कुमार, मनजित आणि जसवीर यांची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

prashant.keni@expressindia.com