सरकार्यवाहक पदासाठी तेजस्वी सिंह यांची बिपिन कुमार यांच्याशी थेट लढत

कबड्डी महासंघ निवडणूक

भारतीय हौशी कबड्डी महासंघाची १५ फेब्रुवारीला होणारी निवडणूक औपचारिकताच ठरण्याची चिन्हे मावळली आहेत. संघटनेचे माजी अध्यक्ष जनार्दन सिंह गेहलोत यांचे पुत्र तेजस्वी सिंह यांच्या सरकार्यवाहपदाच्या मार्गात मात्र अडथळा निर्माण झाला आहे. त्यांना झारखंडच्या बिपिन कुमार सिंग यांनी आव्हान दिले आहे. याचप्रमाणे अध्यक्षपदासाठी तेलंगणाचे कसानी मुदीराज आणि विदर्भाचे जितेंद्र ठाकूर यांच्यात थेट लढत होणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेहलोत कुटुंबीयांचे भारतीय हौशी कबड्डी महासंघावरील वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कार्यकारिणी समितीच्या १४ पैकी १२ जागांवर गेहलोत यांच्या निकटवर्तीयांचीच बिनविरोध निवड झाली आहे. दिनेश पटेल (गुजरात) आणि के. जगदीश्वर यादव (तेलंगणा) यांची उपाध्यक्षपदावर तर, दिल्लीच्या निरंजन सिंग यांची कोषाध्यक्षपदावर निवड झाली आहे. आता येत्या शुक्रवारी फक्त दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे.

निवडणूक

*  अध्यक्ष (जागा : १, उमेदवार : २) : कसानी मुदीराज (तेलंगणा), जितेंद्र ठाकूर (विदर्भ)

*  सरकार्यवाह (जागा : १, उमेदवार : २) : तेजस्वी सिंह (राजस्थान), बिपिन कुमार सिंग (झारखंड)

निवड झालेली कार्यकारिणी समिती

*  उपाध्यक्ष (२) : दिनेश पटेल (गुजरात), के. जगदीश्वर यादव (तेलंगणा)

*  कोषाध्यक्ष (१) : निरंजन सिंग (दिल्ली)

*  संयुक्त सचिव (४) : कुमार विजय सिंह (बिहार), रुक्मिणी कामत (गोवा), ए. सफिउल्ला (तमिळनाडू), कुलदीप कुमार गुप्ता (जम्मू)

*  कार्यकारिणी सदस्य (५) : हनुमंते गौडा (कर्नाटक), कुलदीप सिंग दलाल (हरयाणा), राजकुमार भारंता (हिमाचल प्रदेश), अशोक चौधरी (चंदिगड), भुबनेश्वर कलिता (आसाम)