आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या झेंडय़ाखाली उतरलेल्या भारतीय संघाने इनचॉन (दक्षिण कोरिया) येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई इन्डोअर आणि मार्शल आर्ट्स क्रीडा स्पध्रेत रविवारी आपली विजयी घोडदौड कायम राखली. भारतीय पुरुष संघाने तुर्केमेनिस्तानचा ५४-३७ असा, तर कोरियाचा ४२-२९ अशा फरकाने पराभव करीत आपल्या खात्यावर तिसऱ्या विजयाची नोंद केली. भारतीय महिला संघानेसुद्धा विजयाचा कित्ता गिरविताना चायनीज तैपेई संघाचा ७३-२३ असा धुव्वा उडवला.
महिला विभागात जपानने थायलंडला तोलामोलाची टक्कर दिली. पण अखेर फक्त एका गुणाने (४५-४४) थायलंडने हा सामना जिंकला.
याचप्रमाणे इराणने व्हिएटनामला ६५-३० असे पराभूत केले. पुरुषांमध्ये इराणने थायलंडला ५८-२७ अशा फरकाने पराभूत केले.