‘‘काहीही झालं तरी खेळ महत्त्वाचा, कारण माझ्या नसानसांमध्ये कबड्डी भिनली आहे. लहानपणापासूनच कबड्डीची आवड होती. प्रो कबड्डी लीगच्या निमित्तानं मिळालेली संधी मला काहीही करून सोडायची नव्हती. त्यामुळेच जेव्हा बंगळुरू बुल्सविरुद्धच्या सामन्यात मला दुखापत झाल्यावर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होतं, तेव्हा माझ्या जिवापेक्षा कबड्डी मोलाची वाटली. मैदानात उतरू नको, जिवावर बेतू शकतं, असा सल्लाही काही जण देत होते, पण माझ्या डोक्यात फक्त ‘कबड्डी, कबड्डी..’ हा नाद घुमत होता. त्याच जोशामध्ये मी मैदानात उतरलो,’’ असे सांगत असताना यू मुंबाचा कबड्डीपटू भूपिंदर सिंगच्या डोळ्यांत एक चमक दिसत होती.
‘‘सामना संपल्यावर घरून बरेच दूरध्वनी येत होते. आईचा आवाज हेलावून टाकणारा होता. माझ्या तब्येतीची चौकशी करताना तिचा कंठ दाटून आला होता. हळद-दूध घेऊनच झोप, हा तिचा सल्ला मी ऐकला. पण आता काळजी करण्याचे काही कारण नाही. संघाच्या फिजिओंनी माझ्या चाचण्या केल्या असून आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे,’’ असे भूपिंदरने सांगितले.
जायबंदी झाल्यावर भूपिंदरबाबत संघ चिंतेत होता. पण तो पुन्हा मैदानावर परतल्यानं त्यांनाही हुरूप आला. ‘‘मी जेव्हा मैदानात आलो, तेव्हा कर्णधार अनुप कुमार माझ्याजवळ आला, त्याने तब्येतीची विचारपूस केली. तू आराम कर, आपण सामना जिंकत आहोत, असे त्याने मला सांगितलेही. पण मला मैदानात उतरायचे होते. २००७ मधील राष्ट्रीय स्पर्धेत माझ्या उजव्या हाताला जबर दुखापत झाली होती, पण त्यानंतरही मी काही कालावधीमध्ये मैदानात उतरलो होतो. कारण दुखापती या आमच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात,’’ असे भूपिंदर म्हणाला.
‘‘कबड्डीचे प्रेम लहानपणापासूनच जोपासले होते. शाळेत असताना कबड्डी खेळताना अवीट आनंद मिळायचा. त्यावेळीच कारकीर्द घडवायची ती कबड्डीमध्येच, हे मी मनाशी पक्के केले होते. त्यानंतर आतापर्यंतचा प्रवास हा स्वप्नवत असला तरी भारताकडून खेळायचे स्वप्न कधी पूर्ण होईल, याचीच मी वाट पाहत आहे,’’ असे भूपिंदरने सांगितले.