दुबईत आयोजित कबड्डी मास्टर्समध्ये आज भारतीय संघाने पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारतीय संघाने पाकवर ४१-१७ असा एकतर्फी विजय मिळवून मालिकेतील आपला तिसरा विजय मिळवला. पाकिस्तानवरील या विजयाबरोबर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. कबड्डी मास्टर्सच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तान तर दुसऱ्या सामन्यात केनियावर मात केली होती. दुसरीकडे  इराणने दक्षिण कोरियाचा ३१-२७ पराभव करत उपांत्य फेरीत जागा मिळवली.

‘अ’ गटात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (सोमवार) सामना झाला. भारतीय संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक धोरण अवलंबले होते. पहिल्या हाफमध्ये राोहित कुमार, रिशांक देवाडिगा आणि कर्णधार अजय ठाकूर यांनी भारताला गुण मिळवून दिले. विशेष म्हणजे भारताने पाकला ८ मिनिटाच्या आतच ऑलआऊट केले. पाकिस्तानच्या संरक्षक फळीने पहिल्या हाफमध्ये आपल्या संघाला पुन्हा मैदानात आणले. पहिल्या हाफ अखेर भारतीय संघाने १८-९ ची आघाडी घेतली होती.

दुसऱ्या हाफमध्येही भारताचाच दबदबा कायम राहिला. अजय ठाकूर आणि रिशांक देवाडिगाने पुन्हा एकदा शानदार खेळ करत पाकिस्तानला पुन्हा एकदा ऑलआऊट केले. संरक्षणावेळीही भारतीय संघाने चांगला खेळ केला. या एकतर्फी सामन्यात भारताने ४१-१७ ने विजय मिळवला. भारताने एकूण तीन वेळा पाकिस्तानला ऑलआऊट केले. भारतीय संघाने सलग तिसरा विजय मिळवत उपांत्य फेरीत सन्मानाने प्रवेश केला.

भारताचा पुढील साखळी सामना केनियाबरोबर २६ जून रोजी होणार आहे. दुसऱ्या एका सामन्यात इराणने दक्षिण कोरियाचा ३१-२७ पराभव करत आपला तिसरा विजय मिळवला. इराणनेही उपांत्य फेरीत जागा मिळवली. कोरिया संघाचा हा तीन सामन्यात दुसरा पराभव होता.