प्रो-कबड्डीच्या आगमनानंतर भारतीय क्रीडा रसिकांना क्रिकेटव्यतिरीक्त चांगल्या खेळाचा पर्याय मिळाला. भारतीय मातीतल्या खेळाला प्रो-कबड्डीमुळे जागतिक स्तरावर ओळख मिळाली. प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामात भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला मागे टाकत प्रो-कबड्डीला सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यानंतर आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान समोर आलेली आकडेवारी पाहता कबड्डीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या प्रक्षेपणाला क्रीडा रसिकांनी आपली पसंती दर्शवली आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा या प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीच्या निकषावर दुसऱ्या क्रमांकावर आल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ३१ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान खेळवण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं ४ जानेवारीपासूनच्या सामन्यांचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट फर्स्ट आणि हॉटस्टार या वाहिन्यांवर प्रक्षेपण करण्यात आलं होतं.

टेलिव्हीजन वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येची आकडेवारी तपासणाऱ्या ‘बार्क’ या संस्थेने यासंदर्भातली नुकतीच आकडेवारी जाहीर केली. यानुसार Sony Ten 1 या वाहिनीवर इंग्रजीतून प्रक्षेपित होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याला २४ लाख ६९ हजार लोकांनी पसंती दिली. तर Sony Ten 3 या वाहिनीवर हिंदीतून प्रक्षेपित होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याला १९ लाख ४६ हजार प्रेक्षकांनी पाहणं पसंत केलं. या तुलनेत Star Sports First आणि Hotstar या दोन वाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला १३ लाख ७४ हजार लोकांनी पाहणं पसंत केलं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तरुणांमध्ये चर्चेत असलेल्या WWE Raw या शोपेक्षाही राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला जास्त प्रेक्षकसंख्या मिळाली आहे.

प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामात अनुप कुमारसारख्या खेळाडूंनी एक दिवस भारतात कबड्डी क्रिकेटला मागे टाकेल असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. त्यातच प्रो-कबड्डीमधून ग्रामीण भारतातून आलेल्या खेळाडूंना मिळणारी संधी आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचं होणारं थेट प्रक्षेपण यामुळे कबड्डीकडे पुन्हा एकदा भारतीय क्रीडारसिक वळताना दिसत आहेत.

अवश्य वाचा – अनुपचं स्वप्न साकार, क्रिकेटला मागे टाकत कबड्डी पहिल्या क्रमांकाचा खेळ!