हैदराबादच्या काचीबाऊली मैदानावर झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने अंतिम फेरीत बलाढ्य सेनादलावर मात करत विजेतेपद पटकावलं. तब्बल ११ वर्षांच्या कालावधीनंतर महाराष्ट्राला या विजेतेपदाचा मान मिळाला आहे. रिशांक देवाडीगाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या तरुण संघाने यंदा अनुभवी सेनादलाच्या संघावर अंतिम सामन्यात ३४-२९ अशी मात केली. रिशांक देवाडीगाने कर्णधार म्हणून चढाईदरम्यान केलेला खेळ हा महाराष्ट्राच्या विजयात महत्वाचा भाग ठरला.

उपांत्य फेरीत कर्नाटकचं आव्हान परतवून लावल्यानंतर, अंतिम फेरीत सेनादल विरुद्ध महाराष्ट्र हा सामना कमालीचा एकतर्फी होईल असा अंदाज होता. कबड्डीत सेनादलाचा संघ हा आक्रमक चढाई आणि तितक्याच मजबूत बचावासाठी ओळखला जातो. मात्र सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत महाराष्ट्राने पहिल्या सत्रापासून सामन्यावर आपलं वर्चस्व ठेवायला सुरुवात केली. कर्नाटकविरुद्ध उपांत्य सामन्यात फारशी चमक दाखवू न शकलेल्या निलेश साळुखेंने पहिल्या सत्रात चांगली सुरुवात केली. यानंतर कर्णधार रिशांक देवाडीगा आणि नितीन मदने यांनी आपल्या फॉर्मात येत सेनादलाच्या बचावफळीला खिंडार पाडलं. सेनादलाकडून अनुभवी नितीन तोमर आणि अजय कुमार यांना आज फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या सत्रात १७-१२ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात अनुभवी सेनादलाच्या संघाने आपला संपूर्ण जोर लावत सामन्यात पुनरागमन केलं. याचं श्रेय जातं ते मोनू गोयत या खेळाडूला. मोनू गोयतने आक्रमक चढाया करत महाराष्ट्राच्या बचावफळीत खळबळ माजवली. आपल्या प्रत्येक चढाईत मोनूने २ गुणांची कमाई करत आपली पिछाडी भरुन काढली. मोनूच्या खेळाच्या जोरावर सेनादलाने या सामन्यात काहीकाळासाठी नाममात्र २ गुणांची आघाडीही घेतली होती. मात्र महाराष्ट्राच्या बचावफळीतला अनुभवी डावा कोपरारक्षक गिरीश एर्नाकने मोनूच्या चढायांवर रोख लावत सामन्याचं पारडं महाराष्ट्राच्या बाजूने फिरवलं. यानंतर कोल्हापूरच्या तुषार पाटीलनेही काही निर्णायक चढायांमध्ये गुणांची कमाई करत मोक्याच्या क्षणी महाराष्ट्राकडे आघाडी कायम राहील याची काळजी घेतली. अखेर सामना संपताना अवघी काही सेकंद बाकी असताना कर्णधार रिशांक देवाडीगाने आपल्या अखेरच्या चढाईत ३ गुणांची कमाई करत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.