कबड्डीच्या व्यावसायिक स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या संघांचा फारसा सहभाग नसतो हे लक्षात घेऊन राज्यातील आठ महानगरपालिकांमध्ये कबड्डीपटूंना कंत्राटी पद्धतीने करारावर नोकरी दिली जाईल, असे राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
केरळमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा  तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) अध्यक्ष अजित पवार, महासचिव बाळासाहेब लांडगे, भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील महाराष्ट्राचे प्रतिनिधी नामदेव शिरगावकर उपस्थित होते.
‘‘कबड्डी हा मराठी मातीतील खेळ असूनही आपल्या राज्याचे खेळाडू व्यावसायिक स्पर्धामध्ये फार क्वचित चमकताना दिसतात. अशा स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना अधिकाधिक स्थान मिळविण्यासाठी नैपुण्यवान खेळाडूंना महापालिकांमध्ये नोकरी दिली जाईल,’’ असे आश्वासन त्यांनी दिले.
‘‘खेळाडू हा समाजातील  प्रतिष्ठावान घटक असतो. त्याला सन्मानानेच वागविले जाईल याची काळजी शासनातर्फे घेतली जाईल. खेळाडू म्हणून कार्यरत असताना त्याला पश्चाताप होणार नाही यासाठी त्याला सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. विविध स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शासकीय विश्रामगृहात निवासाची सुविधा देण्यासाठी शासन अध्यादेश काढणार आहे.  आम्हाला योग्य वाटेल व खेळाडूंच्या कामगिरीशी साजेसे रोख पारितोषिक दिले जाईल,’’ असे तावडे यांनी सांगितले.
पवार म्हणाले, ‘‘राज्यात अनेक ठिकाणी तालुका व जिल्हा क्रीडा संकुले तयार झाली आहेत. या संकुलांचा उपयोग राज्यातील खेळाडूंना सराव शिबिरासाठी केला जाईल याबाबत एमओए व राज्याचे
क्रीडा संचालनालय यांच्यात सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.’’