कोरियात होण्याची दाट शक्यता

महाराष्ट्रात पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर अहमदाबादला तिसरी स्पर्धा झाली, परंतु यापुढे दर दोन वर्षांनी नियमितपणे विश्वचषक कबड्डी स्पर्धा होणार आहे. कबड्डीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, ती पाहता २०१८नंतर होणारी २०२०ची विश्वचषक कबड्डी स्पर्धा भारताची वेस ओलांडू शकेल. कोरियातून आर्थिक उलाढालीसाठी मोठय़ा कंपन्यांनी उत्सुकता दर्शवल्यामुळे तिथे होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे तांत्रिक संचालक ई. प्रसाद राव यांनी दिली.

महाराष्ट्राच्या यजमानपदाखाली २००४ आणि २००७मध्ये पुरुषांच्या पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर यंदा तिसऱ्या विश्वचषकाला मुहूर्त मिळाला आहे. परंतु यापुढे प्रत्येक दोन वर्षांनी विश्वचषक स्पर्धा हमखास होईल, अशी खात्री या बैठकीत देण्यात आली. सध्या चालू असलेल्या विश्वचषक स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाची सर्वसाधारण सभा अहमदाबादला झाली. या बठकीत कबड्डीच्या विकासासाठी विविध खंडांमध्ये स्पर्धाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार आगामी काळात युरोप, आफ्रिका, दक्षिण आशिया, दक्षिण अमेरिका, आदी खंडांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा रंगू शकतील. जितक्या प्रमाणात स्पर्धा वाढतील, तितक्याच प्रमाणात खेळाचा दर्जा उंचावेल, असे मत राव यांनी यावेळी व्यक्त केले.

याशिवाय विविध देशांमध्ये कबड्डीचे संबंध आता प्रस्थापित होत आहेत, हे विशद करताना राव म्हणाले, ‘‘कोरियाने केनियाला कबड्डीच्या दौऱ्यासाठी आमंत्रित केले आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाप्रमाणेच त्यानंतर कोरियाचा संघ केनियाच्या दौऱ्यावर जाऊ शकेल. थायलंडच्या संघाला प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांनी बऱ्याचदा भारत दौऱ्यावर आणले होते. या सर्व स्पर्धावर आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे नियंत्रण असेल. त्यामुळे या स्पर्धाना पूर्णत: तांत्रिक मदत संघटनेकडून दिली जाईल. या स्पर्धासाठी पाठवण्यात येणाऱ्या तांत्रिक अधिकाऱ्यांच्या खर्चाचा भागसुद्धा आंतरराष्ट्रीय संघटना उचलेल.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धाप्रमाणे दक्षिण-पूर्व आशियातील थायलंड, मलेशिया, व्हिएटनाम, सिंगापूर, आदी देशांची एखादी स्पर्धासुद्धा लवकरच अस्तित्वात येऊ शकेल.’’

महिलांच्या कबड्डीबाबतसुद्धा या बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. याबाबत राव म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाची मान्यता असलेल्या बऱ्याचशा देशांना आपापले महिला संघ विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. पाकिस्तानसहित आशियातील अनेक देशांचे महिला संघ चांगले आहेत. केनियाच्या संघाने आमचा महिला संघ अधिक चांगला असल्याचे सांगितले.’’

 

भारताला टाळण्याची इराणी रणनीती यशस्वी

अहमदाबाद : अमेरिका आणि थायलंड संघांविरुद्ध शानदार विजयानंतर इराणने सावध पवित्रा स्वीकारला आणि उपांत्य फेरीत भारताला टाळण्याची इराणी रणनीती आखली. त्यानुसार केनिया आणि जपान संघांविरुद्ध त्यांनी पाच गुणांपेक्षा कमी गुणांनी विजय मिळवला तर अखेरच्या साखळी लढतीत पोलंडविरुद्ध संशयास्पद पराभव पत्करला. बुधवारी विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात थायलंडने जपानला नमवून उपांत्य फेरी गाठली, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे इराणची योजना यशस्वी ठरली. त्यामुळे इराण-कोरिया आणि भारत-थायलंड अशा उपांत्य लढती होणार आहेत.

द एरिना स्टेडियमवर झालेल्या थायलंड-जपान लढतीद्वारे ‘ब’ गटातून उपांत्य फेरीत जाणाऱ्या दुसऱ्या संघाचे स्थान ठरणार होते. अपेक्षेनुरूप ही लढत पहिल्या चढाईपासून रंगतदार ठरली. सामन्याच्या १९ व्या मिनिटाला जपानने थायलंडवर पहिला लोण चढवला, तरी मध्यंतराला गुणफलकावर १७-१७ अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात ही रंगत आणखी वाढत गेली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला थायलंडच्या सांती बंचोएटने एका चढाईत तीन गुण मिळवण्याची किमया साधली. ३५ व्या मिनिटाला थायलंडने लोणची परतफेड केली. पण सामना बरोबरीतच चालू होता. अखेरच्या काही मिनिटांत थायलंडने सुसूत्रपणे खेळ करीत ३७-३३ अशा फरकाने सामना जिंकला. त्यामुळे केनिया आणि जपानचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. खोमसाद थोंगखामने (१० गुण) दमदार चढाया केल्या. थायलंड आणि इराण या दोन्ही संघांच्या खात्यावर प्रत्येकी २० गुण जमा झाले तरी गुणफरकाआधारे थायलंडने अव्वल स्थान पटकावले.

उपांत्य फेरीतील दोन्ही संघ निश्चित झाल्यामुळे फक्त औपचारिकता म्हणून उरलेल्या ‘अ’ गटातील अखेरच्या सामन्यात बांगलादेशने अर्जोटिनावर तब्बल चार लोणसहित ६७-२६ अशा फरकाने धूळ चारली. सर्वाधिक १६ गुण मिळवणारा तुहीन तारफदर बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कर्णधार अरुदुझुमान मुन्शीने चढायांचे १३ गुण मिळवत त्याला छान साथ दिली, तर सबूज मियाँने अप्रतिम पकडी केल्या.

untitled-31