राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामधील आर्थिक गैरव्यवहारामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या सुरेश कलमाडी यांच्यासह अ‍ॅथलेटिक्सचे काही वरिष्ठ पदाधिकारी तसेच गैरव्यवहारात अडकलेल्या संस्थांना आगामी आशियाई मैदानी स्पर्धेच्या संयोजनात स्थान नाही, असे राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडानगरीत ३ ते ७ जुलै या कालावधीत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ व राज्य शासनाच्या यजमानपदाखाली आशियाई मैदानी स्पर्धा होणार आहेत. आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षपद कलमाडी भूषवित असल्यामुळे त्यांचा या स्पर्धेत काय सहभाग राहील का, या प्रश्नाला उत्तर देताना वळवी म्हणाले की, ‘‘ज्या पदाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत, त्यांना संयोजन समितीत स्थान दिले जाणार नाही. महासंघाचे अध्यक्ष म्हणून ते येथे येऊ शकतील. आगामी आशियाई स्पर्धेचे आर्थिक व्यवहार पारदर्शी राहतील असा आमचा प्रयत्न राहील.’’
क्रीडानगरीतील ट्रॅक बऱ्याच ठिकाणी खराब झाला आहे. एवढय़ा कमी वेळेत ही दुरुस्ती होणार काय, या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण देताना वळवी म्हणाले की, ‘‘स्पर्धेसाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने विशेष ठराव करीत १८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी पाच कोटी रुपये ट्रॅकचे नूतनीकरण, स्टेडियमवरील अन्य आवश्यक दुरुस्ती आणि अन्य काही नवीन सुविधांवर खर्च केला जाणार आहे. आणखी आठ दिवसांत हे काम पूर्ण होईल. स्टेडियमवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली जाणार आहे.’’ या पत्रकार परिषदेला राज्याचे क्रीडा व शिक्षण खात्याचे अप्पर मुख्य सचिव जे. एस. सहारिया, राज्याचे क्रीडा आयुक्त पंकज कुमार, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सरचिटणीस सी. के. वॉल्सन हेही उपस्थित होते.

विक्रमी प्रतिसाद!
* ४३ देशांच्या ८४१ खेळाडूंच्या प्रवेशिका दाखल.
* भारताचे पथक सर्वाधिक १३६ खेळाडूंचे.
* जपान (७८), चीन (६४), सौदी अरेबिया व बहारिन (प्रत्येकी ४१) यांचेही पथक सहभागी होणार.
* ऑलिम्पिक व विश्वविक्रम करणाऱ्या अनेक धावपटूंचा सहभाग.
* सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूला आगामी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेशिका मिळणार.
* लागोस व तुर्कमिनीस्तान यांची स्पर्धेतून माघार.

स्पर्धेची वैशिष्टय़े
* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना मुंबई येथून पुण्यात आणण्यासाठी वातानुकूलित बसेसची व्यवस्था.
*  स्टेडियमच्या परिसरात असलेल्या क्रीडा वसतिगृहांमध्ये तसेच हॉटेल्समध्ये निवास व्यवस्था.
* राज्याच्या पर्यटन विभागाच्या मदतीने खेळाडूंना पुणे दर्शन करण्याची संधी देणार.
*  सहभागी खेळाडूंकरिता आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थाची सुविधा केली जाणार.
* स्पर्धेसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश.

स्पर्धेचा कार्यक्रम
* उद्घाटन : २ जुलै, वेळ : सायं. ५ ते ७, अतिथी : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
* समारोप : ७ जुलै, वेळ : सायंकाळी, अतिथी : केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार<br />* स्पध्रेच्या वेळा : दररोज सकाळी ९ ते ११ व दुपारी ३ ते रात्री ८.

क्रीडा प्रशिक्षकांना मानधन आशियाई मैदानी स्पध्रेनंतर
पुणे : आशियाई मैदानी स्पर्धेच्या संयोजनाकरिता १८ कोटी रुपये खर्च करण्याची क्षमता असलेल्या राज्य शासनाने ऑलिम्पिकपटू घडविणाऱ्या दीडशे प्रशिक्षकांचे मानधन गेले आठ महिने दिलेले नाही. आता या मानधनाचा विषय स्पर्धेनंतर करू, असे सांगून राज्याचे क्रीडा व शिक्षण खात्याचे अपर मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली आहे. प्रशिक्षकाच्या मानधनाकरिता साधारणपणे ५० ते ६० लाख रुपये राज्य शासनाकडे नाहीत काय असे विचारले असता क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी या पश्नाला बगल देत अन्य माहिती सांगण्यास प्राधान्य दिले. पुन्हा त्यांना हा प्रश्न विचारला असता सहारिया यांनी ‘या प्रश्नावर आशियाई स्पर्धेनंतर आपण चर्चा करू’ असे उत्तर दिले.