रविवारची सकाळ भारतीयांसाठी सुपर संडे ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवसाची सुरुवातच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग ठरली आहे. भारताची नॅशनल रेकॉर्ड ब्रेकर कमलप्रीत कौरनं (Kamalpreet Kaur enters final) आपल्या कामगिरीतलं सातत्य आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत झोकात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीमध्ये कमलप्रीत कौरनं तिन्ही प्रयत्नांमध्ये ६० मीटरच्या वरची कामगिरी केल्यामुळे तिचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालं. त्यामुळे भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अजून एका पदकाची मोठी आशा निर्माण झाली आहे. मात्र, त्याचवेळ भारतासाठी दुसरी आशा ठरलेली सीमा पुनिया मात्र सोळाव्या स्थानावर राहिल्यामुळे अंतिम फेरी गाठू शकलेली नाही.

 

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी झालेल्या फेरीमध्ये भारताच्या कमलप्रीत कौरनं तिन्ही प्रयत्नांमध्ये ६० हून जास्त मीटरवर थाळीफेक केली. यामध्ये पहिल्या प्रयत्नात ६०.२९ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ६३.९७ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा ६३.९७ मीटर अशी कामगिरी कमलप्रीत कौरनं नोंदवली. यामुळे तिनं ग्रुप बीच्या क्वालिफायर लिस्टमध्ये दुसरं स्थान पटकावत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला.

कोण आहे कमलप्रीत कौर?

मूळची पंजाबच्या श्री मुख्तार साहिब जिल्ह्याच्या कबरवाला गावातली असणारी कमलप्रीत कौर हिनं लहानपणापासूनच थाळीफेक सरावाला सुरुवात केली होती. दहावीत असताना तिनं राज्य स्तरीय थाळीफेक स्पर्धेत भाग घेतला होत. त्या स्पर्धेत ती जिंकू शकली नाही. मात्र, तिनं चौथ्या क्रमांकाची कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केलं. या वर्षी मार्च महिन्यामध्येच तिनं टोक्यो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीसाठी खेळताना राष्ट्रीय विक्रम करत ६५ मीटरची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. जून महिन्यात तिनं तिचाच विक्रम मोडत ६६.५९ मीटरची कामगिरी करून दाखवली.