भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतू ही लस घेताना केलेल्या एका गोष्टीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. फिरकीपटू कुलदीप हॉस्पिटलऐवजी आपल्या गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये लसीकरण करताना दिसून आला. त्यामुळे करोनासंबधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

कुलदीपने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एक फोटो शेअर केला आणि ट्वीट करुन सर्वांना ही लस घ्यावी अशी विनंती केली. “जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा लस ताबडतोब घ्या. सुरक्षित राहा कारण करोनाविरुद्ध लढ्यात एकत्र येण्याची गरज आहे”, असे कुलदीपने सांगितले.

 

कुलदीपचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लसीकरणाच्या वेळी कुलदीपला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ देण्यासंबधी आदेश देण्यात आले आहेत. कानपूर जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना या प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

गोविंद नगरमधील जागेश्वर हॉस्पिटलमध्ये कुलदीपला लस देण्यात येणार होती. गोपनीयतेच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले, की कानपूर महानगरपालिकेच्या गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये त्याला ही लस दिली गेली होती. कुलदीपचे ते ट्वीट पाहून लोक असे म्हणू लागले, की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही रूग्णालयात जाऊन लस घ्यावी लागते. अशा परिस्थितीत कुलदीपने प्रोटोकॉल का मोडला?

कुलदीप यादवने गेल्या सहा महिन्यांत एक कसोटी सामना आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. २६ वर्षीय कुलदीपसाठी मागील सहा महिने सर्वात कठीण राहिले आहेत. आगामी इंग्लंड दौर्‍यासाठी त्यांची निवड झालेली नाही.