भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन हे १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यानंतर झालेल्या राड्यावर खुश नाहीयेत. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी केलेला प्रकार खूपच लाजिरवाणा आहे आणि तसे व्हायला नको होतं . यावेळी कपिल आणि अझरुद्दीन यांनी बीसीसीआयकडे भारतीय खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सामना संपल्यानंतर भारत आणि बांगलादेशमधील खेळाडूंमध्ये भांडण झाले होते.

“या खेळाडूंवर बोर्डाने कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे. क्रिकेट हा विरोधी संघाविरुद्ध अपमानास्पद बोलण्याच्या खेळ नाही. मला खात्री आहे की बीसीसीआय नक्कीच या युवा खेळाडूंकडे लक्ष देईल. खेळाडूंमध्ये जोश-उत्साह असणे यात काहीही चूक नाही, परंतु आपण भान हरवू नये. युवा खेळाडूंकडून क्रिकेटच्या मैदानावर ही अपेक्षा केली जाऊ शकत नाही”, कपिल देव यांनी आपलं मत मांडलं.

अझरुद्दीन यांनीही कपिल यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. “सपोर्ट स्टाफ तरुण खेळाडूंना अशा प्रकारे प्रशिक्षण देतात का?? आताच कारवाई करा नाहीतर खूप उशीर होईल.” तसेच खेळाडूंनी शिस्तीत रहावे असे त्यांनी म्हटले आहे. युवा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये चकमक झाली होती.

बांगलादेशच्या मोहम्मद हृदोय, शमिम हुसैन आणि रकिबूल हसन या तीन खेळाडूंनी जल्लोषाच्या भरात मैदानावरच भारतीय खेळाडूंशी हुज्जत घातली. त्यानंतर भारताच्या बिश्नोई आणि आकाश यांनीही रागाच्या भरात बांगलादेशच्या खेळाडूंवर शाब्दिक भडिमार केला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)ने या खेळाडूंवर निलंबन गुण जमा करण्याची कारवाई केली आहे.