पाकिस्तानचे पंतप्रधानपद ग्रहण समारंभाचे निमंत्रण माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांनी पाठवले, तर आपण अवश्य उपस्थित राहणार आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सांगितले.

‘‘मला या समारंभाचे अनौपचारिक निमंत्रण मिळाले आहे, मात्र अद्याप याबाबतचे अधिकृत निमंत्रण आलेले नाही. इम्रान यांच्यासारख्या अष्टपैलू खेळाडू व उच्च व्यक्तिमत्त्व असलेल्या नेत्याकडे त्यांच्या देशाची धुरा सोपवली जाणार आहे ही क्रिकेटसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. गेली २० वर्षे राजकीय नेते म्हणून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी भरपूर कार्य केले आहे,’’ असे कपिल देव यांनी सांगितले.

‘‘इम्रान यांनी पाकिस्तान संघाचे कर्णधार म्हणून संघास विश्वचषकासह अनेकदा देदीप्यमान यश मिळवून दिले आहे. क्रिकेटप्रमाणेच राजकारणातही ते देशाचे नेतृत्व चांगल्या रीतीने करतील अशी मला खात्री आहे. त्यांच्या कारकीर्दीत भारत व पाकिस्तान यांच्यात सौहार्दाचे संबंध निर्माण होतील,’’ असेही कपिल देव यांनी सांगितले.