नवी दिल्ली : विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीकडे भारताच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदासाठीच्या मुलाखती ऑगस्टच्या मध्यावर होणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. कपिल यांच्यासह या समितीवर माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे.

‘‘त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती पुरुषांच्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. ऑगस्ट महिन्यात मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होईल. ही प्रभारी समिती नाही; परंतु या तिघांचे कोणतेही हितसंबंध नाहीत,’’ असे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले.

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अरुण, बांगर आणि श्रीधरन यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विविध प्रशिक्षकपदांसाठी अर्ज मागवले असून, प्राथमिक पडताळणीनंतर मुलाखत प्रक्रिया पार पडेल. ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार नवी क्रिकेट सल्लागार समिती मुख्य प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. अन्य प्रशिक्षकांच्या जागांसाठी मुलाखती घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय निवड समितीकडे सोपवण्यात आली आहे.

सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावरील हितसंबंधांच्या आरोपासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या निकालाची प्रशासकीय समिती प्रतीक्षा करीत आहे.

श्रीधरन ऱ्होड्सपेक्षा सरस : दक्षिण आफ्रिकेचे जाँटी ऱ्होड्स क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असले तरी आर. श्रीधरन या शर्यतीत अग्रेसर मानले जात आहेत. श्रीधरन यांच्यामुळे भारताच्या क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा झाली आहे. त्यामुळे ऱ्होड्स यांचे आव्हान असूनही, निवड समिती श्रीधरनवर विश्वास टाकू शकेल. ऱ्होड्स शर्यतीत असले तरी श्रीधरन यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बांगर यांच्यापुढे पद टिकवण्याचे आव्हान

कोलकाता : संजय बांगर यांना फलंदाजीचे प्रशिक्षकपद टिकवणे जड जाणार आहे. बांगर गेली चार वर्षे फलंदाजीचे प्रशिक्षकपद सांभाळत असूनही भक्कम मधली फळी उभारण्यात त्यांना अपयश आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय हा बांगर यांचा होता. त्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर या निर्णयावर टीका झाली होती.

अरुण गोलंदाजीचे प्रशिक्षकपद टिकवणार?

भरत अरुण यांच्याकडे भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद कायम राहण्याची चिन्हे आहेत. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी लक्षवेधी होत असल्यामुळे अरुण हे गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी निर्विवाद दावेदार ठरू शकतात. मोहम्मद शमी कारकीर्दीतील सर्वोत्तम लयीत आहे, तर जसप्रीत बुमरा सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. याचे श्रेय अरुण यांनाच द्यावे लागेल, अशी माहिती  सूत्रांनी दिली.

विराट-रोहित मतभेद प्रशासकीय समितीने फेटाळले : नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील मतभेदाच्या चर्चा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर रंगल्या होत्या. मात्र या प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेल्या बातम्या आहेत, असे नमूद करीत ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमांवर विराट आणि रोहित यांच्या गटांमध्ये राजकारण सुरू असल्याचे विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर म्हटले जात होते.

विश्वचषकातील भारताच्या कामगिरीचा आढावा नाही : विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी कोणत्याही बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी स्पष्ट केले. ‘‘साहाय्यक प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांकडूनच्या नियमित अहवालाची आम्हाला प्रतीक्षा आहे. पण संपूर्ण संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वेळ कुठे आहे,’’ असा सवालही राय यांनी उपस्थित केला.