भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मात्र आता कपिल देव हे क्रिकेट नाही तर गोल्फच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहेत. जपानमध्ये १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या Asia Pacafic Senior 2018 स्पर्धेसाठी कपिल देव यांची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. रिशी नरिन आणि अमित लुथरा या खेळाडूंसोबत कपिल देव गोल्फच्या मैदानात उतरताना दिसतील.

Asia Pacafic Senior ही स्पर्धा ५५ वयाच्या पुढील खेळाडूंसाठी भरवली जाते. त्यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून देशाची मान उंचावणारे कपिल देव गोल्फच्या मैदानात असताना अशीच खेळी करतात का हे पहावं लागणार आहे. क्रिकेटमध्ये निवृत्ती स्विकारल्यानंतर मी पुन्हा एकदा भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. एक खेळाडू म्हणून या गोष्टीचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रीया कपिल देव यांनी दिली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर कपिल देव यांनी गोल्फकडे आपला मोर्चा वळवला. दिल्ली गोल्फ क्लबमध्ये कपिल देव अनेकदा गोल्फचा सराव करत असतात.