भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाला अवघ्या दोन दिवसांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. एक डाव २६२ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आपण सर्वोत्तम संघ का आहोत हे पटवून दिलं. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी अफगाणिस्तानच्या संघाला कसोटी क्रिकेटमध्ये रुळावण्यासाठी अधिकाधीक संधी मिळाली पाहिजे असा सूर लावला होता. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनीही अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भारतामधील दुलीप करंडकात खेळण्याची संधी दिली जावी अशी मागणी केली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेटला उभारी देण्यामागे बीसीसीआयचा मोठा हात आहे. सुरुवातीच्या काळात अफगाणिस्तानच्या संघाला नोएडा येथील मैदानावर आपल्या घरचे सामने खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. यानंतर बांगलादेश विरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठीही बीसीसीआयने देहरादून येथील नवीन मैदान उपलब्ध करुन दिलं होतं. त्यामुळे दुलीप करंडकात खेळण्याची संधी दिल्यास अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये सुधारणा होईल अशी आशा कपिल देव यांनी व्यक्त केली आहे.

“कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा संयम, सध्याच्या घडीला अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडे नाहीये. दोन दिवसांमध्ये त्यांचा संघ दोनवेळा बाद झाला. त्यामुळे दुलीप करंडकात खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये नेमकं कसा खेळ केला जातो याचा त्यांना अंदाज येईल. भारतामधील सर्वोत्तम स्थानिक खेळाडूंसमोर खेळल्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना आत्मविश्वास येईल.” मिड-डे वृत्तपत्राशी बोलत असताना कपिल देव यांनी आपले विचार मांडले. फलंदाजीत अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी निराशा केली असली, तरीही गोलंदातीत अफगाणिस्तानची कामगिरी वाखणण्याजोगी असल्याचंही कपिल देव यांनी स्पष्ट केलं.