चेन्नईयन एफसी संघाचा गोलरक्षक  करनजीत सिंग याचे मत

इंडियन सुपर लीगमुळे (आयएसएल) भारतीय खेळाडूंना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या विदेशी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यासोबत खेळताना जागतिक फुटबॉल क्षेत्रात भारतीय पिछाडीवर असल्याचे प्रकर्षांने जाणवते, असे मत चेन्नईयन एफसी संघाचा गोलरक्षक करनजीत सिंग याने व्यक्त केले. आयएसएलच्या पहिल्या हंगामात खेळू न शकलेला करनजीत यंदा चेन्नईयन संघाकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अ‍ॅटलेटिको डी कोलकाताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खेळण्यासाठी तो उत्सुक आहे. त्याने पहिल्या सामन्याविषयी आणि आयएसएलविषयी ‘लोकसत्ता’सोबत खास गप्पा मारल्या.

लाजाळूचे झाड अशी ओळख असलेले भारतीय खेळाडू आयएसएलमुळे मनमोकळेपणाने विदेशी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून तोडीस तोड कामगिरी करण्यासाठी धडपडत आहेत. करनजीतही शुक्रवारी सरावादरम्यान विदेशी खेळाडूंच्या जत्रेत चांगलाच रुळला होता. संघातील अर्मेनियन गोलरक्षक एडेल बेटे याच्याकडून तो बचावाचे अनेक डावपेच शिकत होता. ‘‘माझी ही पहिलीच आयएसएल स्पर्धा असल्याने खूप उत्सुक आहे. विदेशी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे अनेक बारकावे शिकायला मिळाले. त्यांच्या खेळाचा दर्जा हा आपल्यापेक्षा फार उच्च आहे आणि म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होतो,’’ असे मत करनजीतने व्यक्त केले.

आयएसएलच्या दुसऱ्या पर्वाच्या लिलाव प्रक्रियेत भारतीय संघाच्या यादीत करनजीत हा एकमेव गोलरक्षक होता आणि त्याला ६० लाख रुपयांत चेन्नईयनने आपल्या ताफ्यात दाखल केले. करनजीत सध्या भारताच्या राष्ट्रीय संघाचा भाग असल्यामुळे त्यालाही आयएसएल अध्र्यावर सोडून राष्ट्रीय कर्तव्यासाठी जावे लागणार आहे. मात्र, गेला एक महिना तो चेन्नईयन संघासोबत आहे. तो म्हणाला, ‘‘ विदेशी खेळाडू आपल्यापासून खूप पुढे आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना मिळणारी सुविधा आपल्याला १३ -१४व्या वर्षी मिळते. यावरून त्यांच्या खेळाच्या दर्जाबाबत आपण अंदाज बांधू शकतो. भारतात मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अपुरे पडतो. आयएसएलमुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद साधण्याचे व्यासपीठ मिळाले आहे.’’

आयएसएलच्या यशस्वी आयोजनानंतर भारतातील जुन्या आय-लीग स्पध्रेचे अस्तित्व धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच ही स्पर्धा आयएसएलमध्ये विलीन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याबाबत करनजीत म्हणाला, ‘‘ आय-लीगचे अस्तित्व धोक्यात आले आहे असे अजिबात वाटत नाही. ज्या पद्धतीने आयएसएलने स्वत:ला घराघरांत नेले, त्यात आय-लीग कमी पडले. मात्र, मोठी नावे नसतानाही आय-लीगच्या सामन्यांना बऱ्यापैकी गर्दी होते. आय-लीग व आयएसएलच्या विलीनीकरणाच्या चर्चा माझ्याही कानावर आल्या आहेत. मला विचारल्यास भारतीय फुटबॉलला फायद्यासाठी असलेली लीग असावी. मग ती एक असो किंवा दोन किंवा त्याहून अधिक. ज्याने येथील खेळाडूंचा फायदा होईल़ खेळाडू म्हणून मला दोन्ही लीगमध्ये खेळायला आवडेल.’’