कृष्णमूर्ती सिद्धार्थचे नाबाद शतक ; शिवम दुबेची प्रभावी गोलंदाजी

बेंगळूरुचा प्रतिभावान युवा फलंदाज कृष्णमूर्ती सिद्धार्थने साकारलेल्या नाबाद शतकाच्या बळावर कर्नाटकने मुंबईविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अ’ गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ४ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून वेगवान गोलंदाज शिवम दुबेने कर्नाटकचे चारही फलंदाज बाद केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने शिशिर भावनेच्या (५) स्वरूपात १६ धावांवर पहिला गडी गमावला. गेल्या सामन्यातील शतकवीर देगा निश्चलही २७ धावा करून तंबूत परतला. मात्र त्यानंतर करुण नायरऐवजी संघात स्थान मिळालेल्या कौनाय अब्बासने सिद्धार्थसह संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गडय़ासाठी १०४ धावांची भागीदारी रचली. मग अब्बास ६४ धावांवर बाद झाला. स्टुअर्ट बिनी (३) चमक दाखवू शकला नाही.

मात्र कर्णधार श्रेयस गोपाळसद सिद्धार्थने दिवसाच्या अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली. दिवसअखेर १३ चौकार व दोन षटकारांसह सिद्धार्थ १०४ धावांवर नाबाद आहे, तर गोपाळने आठ चौकारांसह नाबाद ४७ धावा केल्या आहेत. मुंबईच्या धवल कुलकर्णी, बद्री आलम, शाम्स मुलानी यांना पहिल्या दिवशी एकाही फलंदाजाला बाद करण्यात यश मिळाले नाही.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक (पहिला डाव) : ८८ षटकांत ४ बाद २६३ (कृष्णमूर्ती सिद्धार्थ खेळत आबे १०४, कौनाय अब्बास ६७; शिवम दुबे ४/३२).