गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आणि केरळ या भागांना पुराच्या पाण्याचा चांगलाच फटका बसला आहे. महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर शहरांमध्ये या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी जिवीत आणि वित्तहानी झाली. कर्नाटकातील बेळगाव शहरालाही पुराचा मोठा फटका बसला. मात्र १९ वर्षीय निशान मनोहर कदम या मराठमोळ्या बॉक्सरने पुराच्या पाण्यावरही मात करत, राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत रौप्य पदकाची कमाई केली आहे.

निशान आपल्या परिवारासह बेळगावमधील मन्नूर या छोट्याश्या गावी राहतो. पावसाच्या संततधारेमुळे आजुबाजूला पुराच्या पाण्याचा वेढा होता. मात्र निशानला कसंही करुन आपल्या संघासोबत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जायचं होतं. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी कोणतही वाहन नसल्यामुळे अखेरीस निशानने पोहून जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर निशान आणि त्याचे वडील मनोहर यांनी चक्क अडीच किलोमीटरपर्यंत पुराच्या पाण्यात पोहून जात मुख्य रस्त्यावर पोहचले.

नैसर्गिक आपत्तीमुळे राहत्या घराची दुर्दशा झालेली असतानाही निशानने याचा आपल्या कामगिरीवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. निशानने लाईट फ्लायवेट प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. पुढच्या वर्षी निशानने सुवर्णपदक पटकावण्याचं ध्येय ठेवलं आहे. दोन वर्षांपूर्वी निशानने बेळगावच्या MG Sporting Academy मध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. खेळासाठी निशानने दाखवलेल्या जिद्दीचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.