उपांत्यपूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात; कर्नाटककडून एक डाव आणि २० धावांनी पराभव

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

रणजी करंडक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ अशी मर्दुमकी मिरवणाऱ्या ४१ वेळा विजेत्या मुंबईवर रविवारी उपांत्यपूर्व फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. कर्नाटकने चौथ्या दिवशीच मुंबईला एक डाव आणि २० धावांनी पराभूत करून दिमाखात उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली.

जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर मुंबईचा पहिला डाव १७३ धावांत गुंडाळल्यानंतर कर्नाटकने पहिल्या डावात ५७० धावांचा डोंगर उभारत ३९७ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर कर्नाटकच्या गोलंदाजांनी मुंबईचा दुसरा डाव ११४.५ षटकांत ३७७ धावांवर संपुष्टात आणला.

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने १८० चेंडूंत १६ चौकार व एका षटकारासह झुंजार १०८ धावांची खेळी साकारली. उपाहारापूर्वी यादव धावचीत झाल्याने आठ वेळा रणजी विजेत्या कर्नाटकच्या मार्गातील अडसर दूर झाला. आकाश पारकरने १८६ चेंडूंत ११ चौकारांनिशी ६५ धावा केल्या. ३ बाद १२० धावसंख्येवरून मुंबईच्या डावाला पुढे प्रारंभ करीत यादव आणि पारकर जोडीने चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. मग पारकरने सिद्धेश लाडसोबत पाचव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. ऑफ-स्पिनर कृष्णप्पा गौतमने पारकरला बाद केले.

पहिल्या डावात हॅट्ट्रिकसह सहा बळी घेण्याची किमया साधणाऱ्या कर्णधार आर. विनय कुमारने मग मुंबईला दोन महत्त्वाचे धक्के दिले. कठीण परिस्थितीत धीराने खेळणाऱ्या सिद्धेश लाडला त्याने ३१ धावांवर बाद केले, तर कर्णधार आदित्य तरेला भोपळाही फोडू दिला नाही.

मुंबईचा पराभव समोर दिसत असताना या सामन्यात पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेने जिद्दीने प्रतिकार केला. त्याने ४ चौकार आणि ७ चौकारांसह ७१ धावांची खेळी साकारून मुंबईचा डावाने पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केले. कर्नाटकच्या डावात दुबेने पाच बळी घेतले होते. पदार्पणाच्या सामन्यात पाच बळी आणि अर्धशतक साकारणारा तो मुंबईचा तिसरा खेळाडू ठरला. दुबेने लेग-स्पिनर श्रेयस गोपाळला तीन षटकार खेचले आणि दहाव्या विकेटसाठी शिवम मल्होत्रा (१८ चेंडूंत ० धावा) सोबत ४४ धावांची भागीदारी केली. अखेर गौतमच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात लाँगऑनला झेल देऊन दुबे बाद झाला आणि मुंबईच्या दुसऱ्या डावापुढे पूर्णविराम मिळाला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : १७३

कर्नाटक (पहिला डाव) : ५७०

मुंबई (दुसरा डाव) : ११४.५ षटकांत सर्व बाद ३७७ (सूर्यकुमार यादव १०८, शिवम दुबे ७१, आकाश पारकर ६५; कृष्णप्पा गौतम ६/१०४)

’  निकाल : कर्नाटकचा एक डाव आणि २० धावांनी विजय.

’  सामनावीर : विनय कुमार.