गतविजेत्या कर्नाटक संघाला रविवारपासून सुरू होणाऱ्या रणजी क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम लढतीत तामिळनाडू संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आह़े  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दक्षिणेच्या एकास एक वरचढ संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल़  दोन्ही संघांमध्ये भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा भरणा असल्याने हा सामना अटीतटीचा होईल यात शंकाच नाही़
 कर्नाटक संघ गेल्या दोन वर्षांपासून एकही सामना हरलेला नाही आणि यंदाच्या सत्राच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी तामिळनाडूवर २८५ धावा राखून दणदणीत विजय साजरा केला होता. मात्र या पराभवातून खचून न जाता तामिळनाडूने आलेख चढता ठेवून सत्रातील तो एकमेव पराभव ठरविला़  कर्नाटक संघाकडे फलंदाजांची फौज आह़े  या हंगामातील सर्वाधिक ९१२ धावा करणारा खेळाडू रॉबिन उथप्पा खात्यावर जमा असणारा  त्यांच्याकडे आह़े  त्यापाठोपाठ श्रेयस गोपाळ, रविकुमार समर्थ आणि के. एल. राहुल यांनीही प्रत्येकी सहाशेहून अधिक धावा केल्या आहेत़़  या आघाडीमध्ये सी. एम. गौतम हाही मागे नाही, परंतु मांडीचा स्नायू ताणला गेल्यामुळे अंतिम सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आह़े
गोलंदाजीतही कर्नाटकची बाजू वरचढ आह़े  अनुभवी गोलंदाज व कर्णधार विनय कुमार, अभिमन्यू मिथुन आणि श्रीनाथ अरविंद या त्रिकुटाने मिळून जवळपास ११६ बळी घेतले आहेत़  त्यामुळे अंतिम लढतीत त्यांच्याकडून अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत़  ‘‘गेली अनेक वर्षे आम्ही कर्नाटक संघाकडून खेळत आहोत आणि संघ म्हणून काय करायला हवे याची जाण आम्हाला आह़े  एकमेकांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करतो आणि आशा करतो की, याही लढतीत कामगिरीची पुनरावृत्ती करू,’’ असे मत विनय कुमारने व्यक्त केल़े
तुलना केल्यास तामिळनाडूकडेही मुरली विजय, अभिनव मुकुंद, दिनेश कार्तिक हे भारतीय संघात खेळलेल्या खेळाडूंसह विजय शंकर आणि बाबा अपराजित व बाबा इंद्रजित या फलंदाजीत व गोलंदाजीत छाप पाडणाऱ्या खेळाडूंची फळी आह़े  कर्णधार मुकुंद हा संघातील सर्वाधिक ८१० धावा करणारा फलंदाज असून त्यापाठोपाठ यष्टिरक्षक कार्तिक (७५३) व इंद्रजित (६६८) यांचा क्रमांक येतो़  मलोलन रंगराजन आणि राहिल शाह हे संघातील सर्वाधिक बळी टिपणारे गोलंदाज आहेत़  त्यांच्या नावावर अनुक्रमे ३३ व २७ बळी आहेत़  

सी. एम. गौतमबाबत निर्णय रविवारी सकाळीच होईल़  शंभर टक्के तंदुरुस्त असेल  तरच त्याला अंतिम सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात येईल़
– विनय कुमार, कर्नाटक संघाचा कर्णधार

आम्ही काही चांगल्या लढती खेळलो आहोत़  कर्नाटकच्या कामगिरीत सातत्य असले तरी आमच्याकडे फॉर्मात असलेल्या युवा खेळाडूंची फौज आह़े  त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल़
– अभिनव मुकुंद, तामिळनाडू संघाचा कर्णधार