भारतीय संघातील समावेशाची संधी थोडक्यात हुकलेल्या रॉबिन उथप्पा, केदार जाधव व पारस डोग्रा हे खेळाडू कर्नाटक व शेष भारत यांच्यातील इराणी चषकाच्या क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
गतवर्षी रणजी करंडकापाठोपाठ इराणी चषक स्पर्धेतही कर्नाटकने विजेतेपद मिळविले होते. कर्नाटकने नुकतेच रणजी स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले आहे. उथप्पाने यंदाच्या मोसमात १९ डावांमध्ये ९१२ धावा केल्या आहेत. यंदा त्याला केवळ एकाच शतकावर समाधान मानावे लागले आहे. कर्नाटकच्या आर. विनयकुमार, अभिमन्यू मिथुन व श्रीनाथ अरविंद या वेगवान गोलंदाजांनी संघाला विजेतेपद मिळविण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांच्याविरुद्ध चमकदार कामगिरी करण्यासाठी केदार उत्सुक झाला आहे.  डोग्रा याने २०११-१२ पासून स्थानिक सामन्यांमध्ये पाच द्विशतके टोलविली आहेत.  शेष भारत संघाचे नेतृत्व मनोज तिवारी करत आहे. विनयकुमार व मुंबईचा शार्दूल ठाकूर यांनी या मोसमात प्रत्येकी ४८ बळी नोंदविले आहेत. विनयकुमारच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या कर्नाटकची बाजू वरचढ मानली जात आहे.  
प्रतिस्पर्धी संघ
शेष भारत: मनोज तिवारी (कर्णधार), उन्मुक्त चंद, जीवनज्योत सिंग, केदार जाधव, पारस डोग्रा, नमन ओझा (यष्टिरक्षक), ऋषी धवन, जयंत यादव, प्रग्यान ओझा, शार्दूल ठाकूर, वरुण आरोन, रुश कलेरिया, बाबा अपराजित, जलाज सक्सेना, विजय शंकर.
कर्नाटक: आर. विनयकुमार (कर्णधार), रॉबिन उथप्पा, रविकुमार समर्थ, मनीष पांडे, करुण नायर, श्रेयस गोपाळ, शिशिर भवानी, अभिषेक रेड्डी, उदित पटेल, अभिमन्यू मिथुन, श्रीनाथ अरविंद, एच.एस. शरथ, मयांक अगरवाल, जे. सुचित, के.सी. अविनाश.