रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

कर्नाटकची सात गडी राखून मात; श्रेयस गोपाळ सामनावीर

सलामीवीर देवदत्त पड्डिकल व देगा निश्चल यांनी केलेल्या दमदार अर्धशतकी खेळ्यांमुळे कर्नाटकने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अ’ गटातील साखळी सामन्यात महाराष्ट्रावर सात गडी राखून मात केली. महाराष्ट्राने दिलेले १८४ धावांचे लक्ष्य कर्नाटकने तीन फलंदाजांच्या मोबदल्यातच गाठले. सामन्यात अष्टपैलू चमक दाखवणाऱ्या श्रेयस गोपाळला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

शुक्रवारच्या बिनबाद ५४ धावांवरून पुढे खेळताना कर्नाटकने सावध सुरुवात केली. देवदत्त व देगा यांनी पहिल्या गडय़ासाठी १२१ धावांची सलामी भागीदारी रचून महाराष्ट्राच्या गोलंदाजांना पार निष्प्रभ केले. देवदत्त सत्यजित बच्छावच्या गोलंदाजीवर ७७ धावा करून माघारी परतला. तर देगा ६१ धावांवर बाद झाला. त्यानंतर कौनाएन अब्बासने नाबाद ३४ धावा करत संघाला विजयी रेषा गाठून दिली.

तीन सामन्यांतून एक सामना गमावणारा व दोन सामने अनिर्णित सोडवणारा महाराष्ट्र सध्या ‘अ’ गटात चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र (पहिला डाव) : ११३

कर्नाटक (पहिला डाव) : १८६

महाराष्ट्र (दुसरा डाव) : ९७ षटकांत सर्व बाद २५६

कर्नाटक (दुसरा डाव) : ७०.२ षटकांत ३ बाद १८४ (देवदूत पड्डिकल ७७, देगा निश्चल ६१; सत्यजित बच्छाव २/५६).

सामनावीर : श्रेयस गोपाळ