भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली की मिळालेल्या संधीचे सोने करण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. कर्नाटकचा करुण नायर याच्यात गुणवत्ता असूनही संधी मिळत नसल्याचे तो प्रकाशझोतात आला नव्हता. अखेर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत नायरने आपली योग्यता सिद्ध करून दाखवली आणि थेट त्रिशतकाला गवसणी घातली. करुण नायरसाठी कसोटीतील पहिलेवहिले त्रिशतक अविस्मरणीय आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणातील आपली त्रिशतकी खेळी आणखी खास करण्यासाठी करुण नायरने नवी युक्ती शोधून काढली आहे.

करुण नायरने गुरूवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हार्टच्या इमोजीसह फोर्ड मस्टँग या आलिशान कारचा फोटो ट्विट केला आहे. ‘माय व्हेलेंटाईन’ असे कॅप्शन करुणने आपल्या कारला दिले आहे. करुणची लाल रंगाची फोर्ड मस्टँग कार भन्नाट तर आहेच, पण त्याची नंबरप्लेट त्याहीपेक्षा खास आहे. करुणने आपल्या नंबर प्लेटच्या साहाय्याने आपली त्रिशतकी कामगिरीची आठवण जपली आहे. KA 03 NA 303 असा करुणच्या कारचा नोंदणी क्रमांक आहे. करुणने तो खास मागून घेतला आहे. ३०३ या आकड्याशी करुणचे जवळचे नाते आहे.

इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत नायरने ३०३ धावांची तुफान खेळी साकारली आहे. आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये आपल्या पहिल्या शतकाचे त्रिशतकात रुपांतर करणाचा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. करुण नायरने त्रिशतकी खेळीला आपल्या कारवर स्थान दिले आहे. कारच्या KA 03 NA 303 या क्रमांकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कर्नाटकचे रजिस्ट्रेशन असल्याने त्यावर KA हा राज्याचा कोड आहे. करुणच्या नावाच्या इंग्रजी अद्याक्षरांमध्ये सुरूवातीला हिचा दोन अक्षरं येतात. तर पुढच्या NA या अक्षरांनी त्याच्या आडनावाची सुरूवात होते.