टी २० विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाने बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. शफाली वर्मा (३९) आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने बांगलादेशला १४३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करणे बांगलादेशी फलंदाजांना शक्य झाले नाही. पूनम यादवचे ३ बळी आणि तिला शिखा पांडे, अरूंधती रेड्डी यांनी दिलेली साथ याच्या बळावर भारताने बांगलादेशला ८ बाद १२४ धावांवरच रोखले आणि स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला.

सलग दोन सामने जिंकल्याने भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानी पोहोचले. या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असतानाच मंगळवारी भारताच्या एका १६ वर्षाच्या तरूणीने दमदार कामगिरी करून दाखवली. एकदिवसीय सामन्यात चंदीगडच्या काश्वी गौतम हिने प्रतिस्पर्धी संघाचे एका डावात दहा गडी बाद करण्याची किमया साधली. १९ वर्षांखालील मुलींच्या सामन्यात अरूणाचल प्रदेश विरूद्ध चंदीगड संघाची कर्णधार काश्वी गौतम हिने अष्टपैलू कामगिरी केली. काश्वीने १० बळी टिपले. यात हॅटट्रिकचादेखील समावेश होता. त्याचसोबत तिने फलंदाजीत सर्वाधिक धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

पाहा तिने घेतलेले १० बळी –

असा रंगला सामना

चंदीगड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चंदीगडने ५० षटकांत ४ बाद १८६ धावा केल्या. काश्वीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ६८ चेंडूंत ४९ धावा केल्या. तिला सिमरन (४२) आणि मेहूल (नाबाद ४१) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे चंदीगड संघाने 186 धावांचा पल्ला गाठला.

या आव्हानाचा पाठलाग करताना अरुणाचल प्रदेशचा संघ मात्र ९ षटकांत २५ धावांतच तंबूत परतला. काश्वीने १२ धावांत १० बळी मिळवले आणि संघाला १६१ धावांनी विजय मिळवून दिला.