लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा पारुपल्ली कश्यप चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. २५ वर्षीय कश्यपला स्पर्धेत आठवे मानांकन देण्यात आले आहे. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानी असणाऱ्या कश्यपची सलामीची लढत पात्रता फेरीद्वारे मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूशी होईल. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती सायना नेहवालने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याने महिला गटात पी. सिंधू ही भारताची एकमेव प्रतिनिधी असणार आहे. तिची पहिली लढत अमेरिकेच्या जेमी सुबंधीशी होणार आहे.
पुरुष गटात आरएमव्ही गुरुसाईदत्तची सलामीची लढत मलेशियाच्या मुहम्मद हफीझ हशिमशी होणार आहे. सौरभ वर्माची पहिली लढत मलेशियाच्या डॅरेन लिअूशी होणार आहे. अजय जयराम जपानच्या तिसऱ्या मानांकित केनिची तागोशी दोन हात करणार आहे. आनंद पवारला चीनच्या जिन चेनचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, ज्वाला गट्टाने विश्रांतीचा निर्णय घेतल्याने व्ही. दिजू या स्पर्धेत सहभागी होणार नाही. मिश्र दुहेरीत तरुण कोना आणि अश्विनी पोनप्पा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या जोडीची पहिली लढत मलेशियाच्या जिआन गुओ ओंग- यिन लू जोडीशी होणार आहे.