विश्रांती घेण्याची इच्छा असूनही पारुपल्ली कश्यपचा आगामी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (सॅफ) भारताच्या बॅडमिंटन संघात समावेश करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर कश्यप याला प्रवासाची तिकिटेही पाठविण्यात आली आहेत.
कश्यपला पोटातील स्नायूंच्या वेदनांचा त्रास होत आहे. शिलाँग व गुवाहाटी येथे होणाऱ्या सॅफ स्पर्धेत आपणाला संघात घेऊ नये, अशी विनंती त्याने भारतीय बॅडमिंटन महासंघाकडे तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयास केली होती. तरीही त्याच्या या विनंतीकडे दुर्लक्ष करीत त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
कश्यप याने सांगितले की, ‘‘प्रीमिअर बॅडमिंटन लीग व सईद मोदी ग्रां. प्रि. या दोन्ही स्पर्धाच्या वेळीही मला त्रास होत होता. आता वेदना असह्य़ होत असल्यामुळे मला उपचारांची व विश्रांतीची आवश्यकता आहे. याबाबत मी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक श्रीनिवास यांच्याशीही सविस्तर चर्चा केली आहे.’’