पारुपल्ली कश्यप, एच. एस. प्रणॉय, आरएमव्ही गुरुसाईदत्त या अव्वल बॅडमिंटनपटूंसह प्रणव जेरी चोप्रा या चौघांना करोना संसर्ग झाला आहे. मात्र आघाडीची खेळाडू सायना नेहवालचा करोना अहवाल नकारात्मक आला आहे.
कश्यप, प्रणॉय, गुरुसाईदत्त आणि प्रणव या चौघांमध्येही करोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्यांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले आहे. ‘‘चौघांपैकी एकाला करोनाची लक्षणे जाणवल्याने या सर्वानी आरटी-पीसीआर चाचण्या केल्या होत्या. त्या सकारात्मक आल्या. सायनासह गुरुसाईदत्तची पत्नी अमुल्याचादेखील करोना अहवाल नकारात्मक आला आहे. चारही करोनाबाधित खेळाडूंची सोमवारी पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे.
हैदराबादला २५ नोव्हेंबरला झालेल्या लग्नापासून गुरुसाईदत्त सुट्टीवर होता. मात्र उर्वरित सर्व खेळाडू हैदराबादच्या पुलेला गोपीचंद अकादमीत सराव करीत होते. अर्थातच गुरुसाईदत्तच्या लग्नाला गोपीचंद अकादमीतील खेळाडूंनी उपस्थिती लावल्याने त्या सर्वानी सुरक्षिततेचा उपाय म्हणून करोना चाचणी करून घेतली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 6, 2020 12:12 am