राष्ट्रकुल स्पध्रेतील सुवर्णपदक विजेता भारताच्या पारुपल्ली कश्यपला बुधवारी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पध्रेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. मात्र, किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. महिला दुहेरीत ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा या जोडीनेही आगेकूच केली आहे.
ग्लासगो येथे २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या कश्यपला व्हिएतनामच्या ३२ वर्षीय टीन मिन्ह गुयेनने पराभूत केले. १ तास ५ मिनिटांच्या या संघर्षमय लढतीत टीन याने ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारत १७-२१, २१-१३, २१-१८ अशी बाजी मारली. या पराभवामुळे कश्यपचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला श्रीकांत आणि प्रणॉय यांनी आगेकूच कायम राखली आहे. यंदाच्या वर्षांत भारत सुपर सीरिज स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या श्रीकांतने चायनीज तैपेईच्या ह्सु जेन हाओवर २१-१४, २१-१५ असा, तर जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या प्रणॉयने युगांडाच्या एडवीन एकिरिंगवर २१-१४, २१-१९ असा सहज विजय साजरा केला.
श्रीकांतला पुढच्या फेरीत हाँगकाँगच्या हु यूनचा सामना करावा लागणार आहे. यूनविरुद्ध खेळलेल्या दोन्ही सामन्यांत श्रीकांतने विजय मिळवले असल्याने त्याचे पारडे जड मानले जात आहे. प्रणॉयसमोर पुढच्या फेरीत डेनमार्कच्या विक्टर अक्सेल्सेनचे खडतर आव्हान आहे. यापूर्वी या खेळाडूंमध्ये झालेल्या दोन सामन्यांत अक्सेल्सेनने बाजी मारली.
ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या २०११च्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय जोडीने महिला दुहेरीत तेराव्या मानांकित चायनीज तैपेईच्या ह्सुएह पेई चेन व वू टी जंगवर २१-१०, २१-१८ असा विजय मिळवला. ग्लासगो राष्ट्रकुल स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या या जोडीला पुढील सामन्यात आठव्या मानांकित रेइका काकिवा आणि मियुकी माएडा या जपानच्या जोडीशी सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे प्रज्ञा गद्रे आणि सिक्की एन. रेड्डी यांना महिला दुहेरीत पराभव पत्करावा लागला. जपानच्या शिजुका मात्सुओ आणि मामी नैटोने भारतीय जोडीचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला, तर प्रणव जेरी चोप्रा आणि अक्षय देवळकर यांना पुरुष दुहेरीत डेनमार्कच्या मॅड्स कोन्राड-पीटरसन आणि मॅड्स पिइलर कोल्डींग या जोडीने १६-२१, १२-२१ असे नमवले.