भारतासाठी जपान खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील गुरुवारचा दिवस अतिशय निराशाजनक ठरला. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांचे आव्हान संपुष्टात आले. मात्र राष्ट्रकुल विजेत्या परुपल्ली कश्यपच्या रूपाने एकमेव आव्हान उरले आहे.

बिगरमानांकित कश्यपने जागतिक क्रमवारीतील चौथ्या स्थानावरील श्रीकांतचा ४५ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-११, २१-१९ असा पराभव केला. पुढील फेरीत कश्यपची चायनीज तैपेईच्या सहाव्या मानांकित चोऊ टीन चेनशी गाठ पडणार आहे. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या कश्यपची चेनविरुद्धची आतापर्यंतची कामगिरी २-१ अशी सुखावणारी आहे. ऑल इंग्लंड स्पध्रेत या वर्षी कश्यपने चेनला हरवले आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषवणारी सायना नेहवाल आणि १२व्या स्थानावरील एच. एस. प्रणॉय यांना या स्पध्रेची दुसरी फेरीसुद्धा ओलांडण्यात अपयश आले.
महिला एकेरीत जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदक विजेत्या सायनाने जपानच्या मिनात्सू मिटानीविरुद्धच्या लढतीत १३-२१, १६-२१ असा पराभव पत्करला. तर कोरियाच्या ली डाँग क्यूनने प्रणॉयला २१-९, २१-१६ असे पराभूत केले.
सय्यद मोदी ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेची अंतिम लढत कश्यप-श्रीकांत यांच्यातच झाली होती. तीच चुरस टोकियो मेट्रोपॉलिटिन जिम्नॅशियम स्टेडियमवरील लढतीत पाहायला मिळाली. मात्र कश्यपने वर्चस्वपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले.