07 March 2021

News Flash

कविता राऊत आदिवासी विकास विभागाची सदिच्छादूत?

क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागणारा चपळपणा आणि दमदारपणा आदिवासींमध्ये निसर्गत: असल्याने प्रत्येक आश्रमशाळेत क्रीडा शिक्षकाची स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात येईल

| January 10, 2015 03:40 am

क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागणारा चपळपणा आणि दमदारपणा आदिवासींमध्ये निसर्गत: असल्याने प्रत्येक आश्रमशाळेत क्रीडा शिक्षकाची स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली. याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतवर आदिवासी विकास विभागाची सदिच्छादूत म्हणून जबाबदारी देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे आदिवासी विकासच्या नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धाना शुक्रवारपासून सुरूवात झाली. या स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी सावरा बोलत होते. आदिवासी खेळाडूंना अधिकाधिक प्रशिक्षणाची संधी मिळावी म्हणून नंदुरबार येथे मध्यवर्ती क्रीडा केंद्र तसेच इगतपुरी येथे क्रीडा प्रबोधिनीची उभारणी आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत आहे. विभागामार्फत आदिवासींच्या विकासासाठी दिल्या जाणाऱ्या निधीच्या खर्चाची तपासणी आणि कामांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही सावरा यांनी सांगितले.
‘‘काहीतरी करून दाखविण्याची आपल्यामध्ये क्षमता असून जिद्द दाखवा, यश नक्कीच मिळेल. पुढील वेळी माझ्यासारख्या अजून चार खेळाडूंनी येथे यावे,’’ अशी अपेक्षाही धावपटू कविता राऊतने व्यक्त केली. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धामध्ये सात प्रकल्प कार्यालयातील १३५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 3:40 am

Web Title: kavita raut ambassador to tribal department
टॅग : Kavita Raut
Next Stories
1 दहशतवाद्यांच्या भीतीमुळे सईद अजमलची अकादमी बंद
2 एकदिवसीय क्रमवारीत कोहली दुसऱ्या स्थानावर
3 महाराष्ट्राची विजयी घोडदौड
Just Now!
X