‘‘कारकिर्दीत अनेक स्पर्धा जिंकल्या असल्या तरी पुणे मॅरेथॉन शर्यत माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि यंदा या शर्यतीत विजेतेपद मिळविण्याचा माझा निर्धार आहे,’’ असे राष्ट्रकुल व आशियाई पदक विजेती धावपटू कविता राऊतने सांगितले.
यंदाची पुणे मॅरेथॉन शर्यत १ डिसेंबर रोजी होणार आहे व या शर्यतीच्या नावनोंदणीला महर्षी कर्वे शिक्षण संस्थेत कविता राऊत, सुधा सिंग आदी धावपटूंनी सुरुवात केली. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला, ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू बाळकृष्ण अकोटकर हेही या वेळी उपस्थित होते.
‘‘तापाच्या आजारामुळे मला पुण्यात झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. आता पुण्यातील मॅरेथॉन शर्यत जिंकण्यासाठी मी सराव सुरू केला आहे. यंदाची ही शर्यत जीवनातील मातेच्या महतीस वाहून घेण्यात आली आहे. ही अतिशय चांगली कल्पना आहे. मला घडविण्यात माझ्या घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे,’’ असे कविताने सांगितले.
‘‘जागतिक स्पर्धेत अपेक्षेइतकी कामगिरी मी करू शकले नाही याची मला निश्चित खंत वाटत आहे. त्यामुळेच पुण्याची शर्यत जिंकून माझ्या आईला आगळी वेगळी भेट देण्याचे माझे ध्येय आहे,’’ असे सुधा सिंगने सांगितले. ती पुढे म्हणाली, ‘‘बंगळुरूच्या राष्ट्रीय सराव शिबिरात कविताच्या साथीने मी सराव करीत आहे. तिचेही मला मार्गदर्शन मिळत आहे. महाराष्ट्रातील मोनिका आठरे, पूजा वऱ्हाडे, मोहिनी व रोहिणी राऊत, मनीषा साळुंके या खेळाडूही मॅरेथॉन शर्यत गाजवतील अशी मला खात्री आहे.’’
मुंबई मॅरेथॉन शर्यत जिंकणारा इलाम सिंग याने पुणे मॅरेथॉन शर्यतीमधील पुरुष गटात पहिली प्रवेशिका नोंदविली. तो म्हणाला, ‘‘सेनादलातील माझ्या अन्य सहकाऱ्यांबरोबर मी पुण्याच्या शर्यतीकरिता कसून सराव करीत आहे.’’