07 July 2020

News Flash

‘बालभारती’ मध्ये कविता राऊत

भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊतची खडतर वाटचाल आता धडय़ाच्या स्वरूपात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात असणार आहे.

| May 22, 2015 04:05 am

भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊतची खडतर वाटचाल आता धडय़ाच्या स्वरूपात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात असणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘यशवार्ता’ या मासिकाचे कार्यकारी संपादक संतोष साबळे लिखित कविता राऊतवरील धडय़ाचा समावेश येत्या शैक्षणिक वर्षांपासून ‘बालभारती’च्या नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’ने येत्या शैक्षणिक वर्षांपासून या पाठाचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाऱ्या कविताच्या संघर्षमय प्रवासावरील हा धडा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याने त्याचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.
कविता सध्या मुक्त विद्यापीठातूनच शिक्षण घेत आहे. मराठी भाषा समितीचे ज्येष्ठ सदस्य इरगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या पुस्तकात यदुनाथ थत्ते, डॉ. अनिल गोडबोले, डॉ. सरोजिनी बाबर, द. मा. मिरासदार, कवयित्री बहिणाबाई चौधरी या मान्यवरांचे धडे आणि कवितांचाही समावेश आहे.
सावरपाडय़ाचे नाव देशभर झाले असले तरी माझ्या जीवन प्रवासावरील धडय़ाचा बालभारतीने अभ्यासक्रमात समावेश केल्याने खूप आनंद झाला. राज्यातील मुलींनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडेवळायला हवे असे वाटते. यासाठी मुक्त विद्यापीठ उत्तम पर्याय आहे.
-कविता राऊत (आंतरराष्ट्रीय धावपटू)

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रेरणा देणाऱ्या कविता राऊत यांच्या जीवनावरील पाठ बालभारतीच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.
–  कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण करतांना देशाचे नाव उंचावणाऱ्या कविताची आजवरची वाटचाल, मिळालेले यश हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वेगळी दिशा आणि बळ देणारे आहे. विद्यापीठाने संधी दिल्याने ‘यशोगाथा’ पुस्तकाची निर्मिती करता आली. आता हा धडा संपूर्ण राज्यात शिक विण्यात येणार असल्याचा आनंद वाटत आहे.
– संतोष साबळे (लेखक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2015 4:05 am

Web Title: kavita raut savarpada express in balbharti
टॅग Kavita Raut
Next Stories
1 विश्वचषक सामन्यांना मुंबईकर मुकणार?
2 महाकबड्डी लीगला खेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
3 कोपा इटालियावर ज्युव्हेंटसचे राज्य
Just Now!
X