हिरवीगार झाडे.. खेडय़ापाडय़ातून जाणाऱ्या रस्त्यांवरून धावणारे स्पर्धक.. गुलाबी थंडी.. अशा वातावरणात वसई-विरार मॅरेथॉन शर्यतीत तीन स्पर्धाविक्रमांची नोंद झाली. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊतने महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत स्पर्धाविक्रमाची नोंद करताना वसई-विरार मॅरेथॉनमध्ये हॅट्ट्रिक साजरी केली. सैन्यदलाच्या नीरज पालने कडव्या स्पर्धकांचे आव्हान मोडीत काढत पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनचे जेतेपद पटकावले. पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटच्या जी. लक्ष्मणनने अपेक्षेप्रमाणे अर्धमॅरेथॉनमध्ये बाजी मारली. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, फ्रान्सचा अव्वल फुटबॉलपटू मिकेल सिल्व्हेस्टर आणि भारताची माजी लांब उडीपटू व स्पर्धेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर अंजू बॉबी जॉर्ज यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
सुधा सिंगच्या अनुपस्थितीत सात किलोमीटर अंतरावरून सर्व स्पर्धकांना मागे टाकत कविता राऊतने मागे वळून पाहिले नाही. ललिता बाबरचा विक्रम ६ मिनिटांनी मागे टाकत कविताने १ तास १६.१० मिनिटांत शर्यत पार करून नवा स्पर्धाविक्रम प्रस्थापित केला. तिची नाशिकची सहकारी मोनिका आथरेने १.१७.४८ सेकंद अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. नागपूरच्या मोनिका आणि रोहिणी राऊत या जुळ्या बहिणी अखेरच्या क्षणापर्यंत एकत्र धावत होत्या. पण मोनिकाने रोहिणीला अवघ्या १८ सेकंदांनी मागे टाकत तिसरे स्थान पटकावले.
देशातील अव्वल धावपटू मुंबई मॅरेथॉन आणि राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीला लागले असताना त्यांनी वसई-विरार मॅरेथॉनकडे पाठ फिरवली. त्यामुळे पुरुषांमध्ये अवघ्या १५ अव्वल धावपटूंमध्ये जेतेपदासाठी चुरस होती. अखेर नीरज पालने २.२२.३८ सेकंद अशी वेळ देत जेतेपदावर नाव कोरले. त्याने एलाम सिंगने २०१२मध्ये रचलेला विक्रम मोडीत काढला. पुरुषांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत जी. लक्ष्मणनने १.०४.०६ सेकंद अशी कामगिरी करत जेतेपद मिळवले. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटच्या खेता रामने १.०५.३३ सेकंदासह दुसरे तर पश्चिम रेल्वेच्या सोजी मॅथ्यूने १.०६.३७ सेकंदासह तिसरे स्थान प्राप्त केले.